रेल मंत्रालय, नवी दिल्लीच्या प्रवासी सुविधा समितीला पालकमंत्र्यांचे आमंत्रण
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आमंत्रण
बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी करण्याकरीता भेट देणार.
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
चंद्रपूर : २७ नोव्हेंबर २०२२ रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकातील प्लॅट फार्म नं. १ समोरील ४५ वर्षे जुन्या रेल्वे ब्रिजला भगदाड पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यु, तर १७ प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे बल्लारशाह रेल्वे स्थानक, त्याचसोबत चंद्रपूर रेल्वे स्थानक व बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी करण्याकरीता रेल मंत्रालय, नवी दिल्लीच्या प्रवासी सुविधा समितीला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रण दिले होते. १२ जानेवारी २०२३ रोजी भारत सरकार रेल मंत्रालयाची प्रवासी सुविधा समिती दुपारी १२ वा. बल्लारशाह रेल्वे स्थानक, ०१ वा. बाबुपेठ उड्डाण पुल व ०२ वा. चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील सुविधांचा आढावा घेऊन प्रवाशांच्या अडीअडचणी समजुन घेण्याकरीता त् यांच्याशी संवाद साधणार आहे. यानंतर रेल्वे अधिका-यांसोबत बैठक घेऊन, रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेबाबत व सुविधांबाबत विस्तृत चर्चा करुन आढावा घेणार आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन रेल्वे स्थानकाबाबतच्या समस्या, तांत्रीकबाबी, पायाभूत सुविधा व अडचणींची सोडवणुकीबाबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. त्याचसोबत बाबुपेठ उड्डाण पुल लवकरात लवकर सर्व सोयीसुविधा युक्त निर्माण होऊन प्रवाशांच्या सेवेकरीता उपलब्ध व्हावा याबाबतही चर्चा केली जाणार आहे.