भोजपूर :बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील हरखेन कुमार जैन धर्मशाळेत आज सकाळीच बॉम्बस्फोट झाला. बिहारमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनी धर्मशाळेत बॉम्ब ठेवतानाच त्याचा स्फोट झाल्याने त्यात एक अतिरेकी जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्याचे चार साथीदार पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.भोजपूर जिल्ह्यातील आरा येथील बडीचौकी जवळ असलेल्या हरखेन कुमार जैन धर्मशाळेत बॉम्बस्फोट झाल्याने या परिसरात धावपळ उडाली आहे. या घटनेनंतर धर्मशाळा परिसरात मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला असून या परिसरात जाण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे. बॉम्बविरोधी पथकानेही घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.आज सकाळी ५ वाजता ५ संशयित अतिरेकी आरा येथे आले होते. आरामध्ये आल्यानंतर त्यांनी थेट धर्मशाळा गाठली आणि त्यांच्या खोलीत सामान ठेवायला सुरुवात केली. हे सामान ठेवत असतानाच झालेल्या बॉम्बस्फोटात एक दहशतवादी जखमी झाला. त्यानंतर बाकीच्या चार दहशतवाद्यांनी तिथून तात्काळ पलायन केलं. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दहशतवाद्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे. आरामध्ये मोठा हल्ला करण्यासाठीच हे दहशतवादी आले होते असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, यापूर्वी महाबोधी मंदिरात बॉम्ब आढळले होते. त्याचा आणि आजच्या घटनेचा काही संबंध आहे का याचाही तपास सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.