वेतन फरकाची रक्कम लाटणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई,

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेत १ कोटी १९ लाखांचा अपहार करणाऱ्या नाना कोरडे यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जारी केले आहे. शुक्रवारी रात्री उशीरा कोरडे यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही कारवाई करण्यात आली. कोरडे यांना देश सोडून जाऊ नये असे आदेशही देण्यात आले आहे
नाना कोरडे पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. कर्मचाऱ्यांची वेतन बीले तयार करण्याचे काम त्याच्याकडे होते. ही बीले तयार करतांना कर्मचाऱ्यांची मागील थकबाकी आणि वेतन फरकाची रक्कम दाखवून त्याचे धनादेश तयार करून, त्यावर स्वतःच सह्याकरून ही रक्कम तो परस्पर स्वतःच्या अथवा पत्नीच्या खात्यावर वर्ग करत होता. गेली दीड वर्ष हा प्रक्रार बीन बोभाट पध्दतीने सुरू होता. आर्थिक वर्षातील शेवटचे तीन महिने सुरू झाल्याने, लेखा विभागाने आयकरा संदर्भात तपासणी सुरू केली. तेव्हा अधिकाऱ्यांना तपासणीत काही तरी काळबेरं असल्याचा संशय आला. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आणि या प्रकरणी सखोल चौशी सुरू झाली. तेव्हा नाना कोरडे यांनी केलेले नाना उद्योग समोर आले. प्राथमिक चौकशीत कोरडे यांनी १ कोटी १९ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आले. आपण केलेला अपहार उघडकीस येत असल्याचे लक्षात येताच कोरणे यांनी ६८ लाखांची रक्कम दोन धनादेशांव्दारे जिल्हा परिषदेला परत केली. प्रशासकीय कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने उर्वरीत रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र प्रशासनाने त्याच्याविरोधात प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला.
दरम्यान कोरडे यापुर्वी एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत होता तिथंदेखील त्‍याने असे प्रकार केल्‍याची बाब समोर आली आहे. हा एकूण अपहार ४ते५ कोटी रूपये इतका असण्‍याची शक्‍यता आहे.

पाच सदस्‍यीय चौकशी समिती
या संपूर्ण प्रकाराच्‍या चौकशीसाठी पाच सदस्‍यीय समिती गठीत करण्‍यात आली आहे. यात उपमुख्‍य लेखाधिकारी महादेव केळे, लेखाधिकारी सचिन घोळवे, सहाय्यक लेखाधिकारी समीर अधिकारी,पराग खोत आणि नितीन खरमाटे यांचा समावेश आहे. यात सध्‍यातरी अन्‍य कर्मचारयांचा सहभाग दिसून येत नाही. मात्र त्‍याचीही कसून चौकशी केली जाणार आहे. अलिबाग येथील एकात्मिक बालविकास प्रकल्‍प कार्यालय येथेही त्‍याने पैशाचा अपहार केल्‍याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. तो म्‍हसळा येथेही कार्यरत होता. तेथे त्‍याने असे प्रकार केले आहेत का याचीही चौकशी केली जाणार आहे. चौकशी पुर्ण झाल्यानंतर, सर्व पुराव्यांनिशी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here