28 वा ऑरेंज क्राफ्ट मेळा, 20 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार आहे

मीडिया वार्ता न्युज
१५ मार्च, नागपूर: नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या 28 व्या ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोक नृत्य समारंभ’ च्या तिसऱ्या दिवशी 13 मार्च 2022 ला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षी प्रवेशद्वार आणि मंच सजावट ग्रामीण संस्कृतीवर आधारित आहे. पारंपारिक भारतीय घरांच्या अंगणाप्रमाणे अंगण संकल्पनेवर याचे आयोजन करण्यात आले आहे.
13 मार्च 2022 च्या कार्यक्रमाचा प्रारंभ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक मंडळाचे सदस्य आनंद कसबे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय रांगोळी आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत ग्रोते, माजी निबंधक अरविंद पाटील यांनी दीपप्रज्वलन करून केला. संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून बहारदार लोकनृत्यांचा आविष्कार सुरु झाला. पौर्णिमा चव्हाण आणि त्यांच्या सहकलाकारानी गणेश वंदना सादर करून याची सुरवात केली. त्यानंतर गोटिपुआ नृत्य (सत्यपिरा पलाई आणि समूह, ओडिसा), राई नृत्य (पद्मश्री. रामसहाय पांडे आणि समूह, मध्य प्रदेश), पंथी (पद्मश्री राधेश्याम बारले आणि समूह, छत्तीसगढ़), छपेली (प्रकाश बिष्ट आणि समूह, उत्तराखंड), बिहु (गिरीराज आणि समूह, आसाम), लावणी (पौर्णिमा चव्हाण आणि समूह, मुंबई, महाराष्ट्र) आणि चकरी (शिवनारायन आणि समूह, राजस्थान) यांच्या नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. व्यवस्थापन आणि लेखा अधिकारी दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या मेळ्याला रविवारी संध्याकाळी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. केंद्र परिसरात सर्वत्र गर्दी दिसून येत होती. बहुरूपी आणि कच्ची घोडी नृत्याने लहान मुलांना आकर्षित केले, बच्चे कंपनीने यांच्या समवेत फोटोही काढले. क्राफ्ट मेळ्यातून जनतेने हस्तकला वस्तूंची जोरदार खरेदी केली.
याचदरम्यान “मुझमें भी कलाकार” या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे.
28 वा ऑरेंज क्राफ्ट मेळा, 20 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये दर दिवसासाठी प्रती व्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. दुपारी दोन वाजल्यापासून ‘क्राफ्ट मेळा आणि फूड झोन’ मध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो तर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून सांकृतिक कार्यक्रम सादर केले जातात. अधिकाधिक प्रेक्षकांनी या मेळ्याला भेट देऊन आनंद घ्यावा असे आवाहन नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने केले आहे.
हे आपण वाचलंत का?