खुनाचा आरोपी 4 तासात गजाआड, माथेरान पोलिसांची दमदार कामगिरी..
✍🏻श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो. 8793831051
माथेरान :- माथेरान मधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहात कंत्राटी बेसवर काम करत असलेल्या तीन कामगारांच्या आपसी भांडणात एकाचा छाती आणि पोटावर वार करून खून करण्यात आला.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यास सुरुवात केली.इतर दोघांमध्ये विचारपूस करत असताना काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी पोपटासारखे बोलू लागले.चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले.
13 मार्चच्या रात्री रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील कॉटर मध्ये मयत सुशांत गेजगे(वय:-26),दिनेश तिवारी(वय:-47),प्रेमकिशोर पाल(वय:-29) हे तिघे राहत होते.रात्री 11:20 च्या सुमारास बसले असता प्रेमकिशोर पाल याने सुशांत गेजगे याचा फोन मागितला असता तो न दिल्याने सुशांत याने प्रेमकिशोर याच्या कानशिलात लगावली व शिवीगाळ केली.यावर दिनेश तिवारी याने शिवीगाळ करू नकोस असे सांगितले.यावर रागावलेल्या सुशांतने दिनेश तिवारी याच्या कानाखाली मारून त्याच्या तोंडावर आणि डोळ्यावर ठोशे मारले.त्यात सुशांत आणि दिनेश यांच्यात झटापट झाली.यावर दिनेश तिवारी आणि प्रेमकिशोर पाल यांनी संगनमत करून किचनमधून चाकु आणून सुशांतच्या छातीवर आणि पोटावर वार करून त्याला ठार मारले.सदरचा प्रकार जेव्हा सकाळी दिनेश आणि प्रेमकिशोर याना समजताच आता पोलीस येतील या भीतीने तिथून पळ काढला.पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलीस उप निरीक्षक गणेश गिरी,पोलीस हवालदार अशोक राठोड यांनी फिर्यादी आझाद लष्कर याच्यासोबत माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी गाठून दिनेश यास ताब्यात घेतले.दिनेश तिवारी आणि प्रेमकिशोर पाल याना पोलीस ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने,पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी विचारपूस केली.पण आरोपींनी आम्ही गुन्हा केलाच नाही असे सांगितले.मात्र पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दोघांना दाखवताच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
सदरचा प्रकार कसा घडला याचे इतिवृत्त आरोपींच्या तोंडून ऐकल्यानंतर रात्री 2:22 मिनिटांनी गुन्हा दाखल करून क्रूरकर्मा दिनेश तिवारी व प्रेमकुमार पाल याना अटक करण्यात आली.तेथील केयर टेकर आझाद लष्कर याने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी फक्त चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्यात.माथेरान पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिकांकडून पोलिसांचे भरभरून कौतुक होत आहे.
