२६ गाव पाणी पुरवठा योजनेला अडसर ठरणारे अनधिकृत नळ कनेक्शन हटविण्यात येणार

२६ गाव पाणी पुरवठा योजनेला अडसर ठरणारे अनधिकृत नळ कनेक्शन हटविण्यात येणार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रोहा तालुक्यातील २६ गाव उजवा तीर, डावा तीर पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली असून, योजनेत समाविष्ट गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याबाबत ग्रामस्थानी निवेदन देत, मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी नुकतीच ग्रामस्थ, एमआयडीसी अधिकारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी अधिकृत नळ कनेक्शनमुळे गावांना पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगितले. यावेळी एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे मान्य केले. याबाबत डॉ. भरत बास्टेवाड यांनी योजनेवरील अनधिकृत नळ कनेक्शन काढण्याच्या सूचना एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देत, या संबंधित पत्रव्यवहार संबंधित विभागांसोबत केला आहे. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन काढल्यानंतर योजनेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्यात येणार आहे.

रोहा तालुक्यातील २६ गावातील सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देत, मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी खान यांच्यासह २६ गाव नागरिकांचे शिष्टमंडळ, एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत २६ गाव पाणी पुरवठा योजना २००८ मध्ये मंजूर करण्यात आली. योजनेत उजवा तीर पडम ते धोंडखार १४ गावे व डावा तीर खारगाव ते कोकबन १२ गावांचा समावेश आहे. २०१३/१४ मध्ये पाणीपुरवठा सुरू झाला, मात्र यामध्ये योजनेत समाविष्ट गावे सोडून आधी येणाऱ्या गावांमधील काही खासगी मालमत्ताधारकांकडून अनधिकृतपणे कनेक्शन घेतले. यामुळे योजनेत समाविष्ट गावांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. २०२२/२३ मध्ये येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे बहुतांश पूर्ण होत आली आहेत. मात्र अनधिकृत नळ कनेक्शन मुळे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली, तसेच संबंधित अनधिकृत नळ कनेक्शन हटविण्याची मागणी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडे केली. एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी येथे अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे मान्य केले.

यावेळी संबंधित अनधिकृत नळ कनेक्शन हटविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. तसेच या योजनेची कामे पूर्ण झाली असल्याने अनधिकृत नळ कनेक्शन हटविल्यानंतर संबंधित योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्यात येणार आहे. योजना हस्तांतरित करण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या व्यतिरिक्त संबंधित गावांमध्ये सध्या पाणी टंचाई असल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा नळ कनेक्शन हटविल्यानंतर योजनेतील गावांना सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडा संयम पाळावा, असे आवाहनही डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
………………….