मुंबई राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. राजकपूर विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना, तर चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्काराची घोषणा केली.

५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ५ लाख रुपये, मानपत्र असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप असून तीन लाख रुपये, मानपत्र असे विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप आहे. विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षापासून मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजविली आहे. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी दाद दिली आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकात विजय चव्हाण यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. धर्मेंद्र यांना २०१२ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्वामी’ या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here