स्पॉटलाईट: बदलत्या हवामानाचे संकट
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
सध्या आपण विचित्र असे हवामान अनुभवत आहोत. अनेक भागात भर उन्हाळ्यात पावसाचे थैमान चालू आहे. काही ठिकाणी तर नदीला पूर आला आहे. बरं हा पाऊस अवकाळी पाऊस आहे असे म्हटले तर तो वर्षभर पडतोय हिवाळा असो की उन्हाळा पावसाची जोरदार बॅटिंग चालूच असते.
केवळ पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात गारपीटही होत आहे. या अवकाळी पावसाने बळीराजा तर हतबलच झाला आहे कारण पिके काढणीला आली असताना अवकाळीचा तडाखा येतो आणि क्षणात होत्याचे नव्हते होते. हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त होत असल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाकडून बळीराजाला नुकसान भरपाई मिळते मात्र ती तुटपंजी असते त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात आसवे येतात.
अवकाळीने राज्यातील जवळपास २५ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांची, फळबागांची नासधूस झाली आहे. काही ठिकाणी वीजा कोसळून जनावरे दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे केवळ बळीराजाचेच नुकसान होतेय असे नाही तर जीवित आणि वित्तहानी देखील होत आहे. अकोला जिल्ह्यातील पारस येथील एका मंदिराच्या शेडखाली बसलेल्या भाविकांच्या अंगावर पत्र्याचे शेड पडले त्यात सात भाविकांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी विजा पडल्या त्यात काहींना जीव गमवावा लागला. मनुष्य हानी प्रमाणे पशुहानी देखील मोठया प्रमाणात होत आहे.
एककिडे अवकाळी पाऊस आपले रुद्र रूप दाखवत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात सूर्यदेव आग ओकत आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जवळपास ४० ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेमुळे अनेकांना उष्माघात होत आहे. एककडी अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडक उष्णता असे विषम हवामान एकाच वेळी अनुभवत आहोत. एकाच वेळी ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा विचित्र हवामानाचा सामना आपल्याला करावा लागत आहे.
बरे हे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे असे नाही तर मागील दोन ते तीन वर्षांपासून आपण असेच विषम हवामान अनुभवत आहोत. एकीकडे विषम हवामान अनुभवत असताना काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहे. बद्री केदारनाथ येथील जोशीमठ मधील घटना ताजीच आहे. हवामान बदलाचा परीणाम हिमनद्यांवर देखील होत आहे. हवामान बदलामुळे हिमालयातील अनेक नद्या वितळत आहेत. हवामान बदलामुळे भूस्खलन, हिमस्खलन अशा घटना घडत असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के देखील अनुभवायला मिळत आहे.
अर्थात या घटना नैसर्गिक आपत्ती आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही कारण मागील दोन तीन वर्षांपासून हेच घडत आहे. दरवर्षी हे असे का घडत आहे ? निसर्गचक्र का बदलले आहे? सातत्याने हवामानात बदल का घडत आहे याचा विचार व्हायला हवा. हवामान बदलाच्या कारणांचा अभ्यासपूर्ण व सखोल शोध घ्यायला हवा. त्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती नेमायला हवी. या समितीने नैसर्गिक घटनांचा अभ्यास करून येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करायला हवे.