शिक्षणाचा मार्ग सुखद करण्याचा प्रयत्न
सायकलीतून शिक्षणाला गती मिळणार
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सावित्रीच्या लेकी या उपक्रमातून ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलींना सायकल देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाला गती देण्याचे काम या उपक्रमातून केले आहे. सायकल देण्याबरोबरच दप्तर, शाळेचा गणवेश, वह्या, शूज, छत्री, स्वेटर, वर्षभर पुरतील असे शैक्षणिक साहित्यदेखील मुला मुलींना देण्यात आले आहेत. पाच हजार मुला मुलींना शाळेत जाण्यासाठी कायमची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आनंद आहे.सायकल व शैक्षणिक साहित्यातून शिक्षणाला गती मिळणार असून आज हजारो मुलींच्या शिक्षणाचा मार्ग समृध्द आणि सुखद करण्याचा प्रयत्न यातून केला आहे, असे सीएफटीआयच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने तसेच उद्योगपती जयदेव मोदी यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील 17 हुन अधिक गावांमधील पाच हजार मुला, मुलींना सायकल, दप्तर तसेच वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्य मोफत देण्याचा कार्यक्रम अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला. पेडल ऑफ होम या उपक्रमांतर्गत पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात हा वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी
शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, सुरेश घरत, नरेश म्हात्रे, विलास म्हात्रे, धोकवडेचे माजी सरपंच सचिन म्हात्रे, वेश्वीच्या रश्मी पाटील, विजय भगत, रविंद्र पाटील, प्रमोद घासे, अनिल पाटील, विक्रांत वार्डे, अमोल नाईक, महाविद्यालय, विद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक, वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, स्व.नारायण पाटील, स्व. प्रभाकर पाटील यांनी शिक्षणाला महत्व दिले. गावे, वाड्यांमधील मुले शिकली पाहिजे हा ध्यास त्यांनी कायमच ठेवला. तो वारसा जपण्याचे काम पाटील कुटूंबियांची चौथ्या पिढीपासून सुरु आहे. पाटील कुटूंबियांनी शैक्षणिक, सामाजिक, सहकार अशा अनेक संस्था उभारल्या. त्या संस्था वाढविल्या, मोठ्या केल्या. त्यांना समाजोपयोगी केल्या. त्याच धर्तीवर सीएफटीआय सारखी संस्था उदयास आली. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे दीड लाख नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल केला आहे. त्यामध्ये कोरोना काळात वॅक्सीन वाटप, शाळकरी मुलींना सायकल देणे, अन्नधान्य तसेच घरकूल देऊन उभारी देण्याचे काम केले आहे. अलिबागसह मिझोराम या भागात उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. यातून आपल्या अलिबागचे आणि पाटील कुटूंबियांचे नाव मोठे केले आहे.
जयदेव मोदी हे मोठे व्यावसायिक आहेत. अलिबागचे रहिवासी आहे. अलिबागमधील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मोदी यांच्या ग्रुपच्या मार्फत मदतीचा हात देण्यात आला आहे.
———-
विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर हसू फुलले
गरीब गरजू विद्यार्थींनींच्या शिक्षणाला अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने सायकल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
————–
सतरा गावांतील मुला मुलींना आधार
आगरसुरे, मुळे, भुते, धामणपाडा, धोकवडे, मांडवा, नेहूली खंडाळे, मेढेखार, पोयनाड, मापगांव, पेझारी आंबेपूर, सातिर्जे, शहाबाज, श्रीगांव, थळ, वरसोली, झिराड या व इतर सतरा हुन अधिक गावांतील हजारो मुला, मुलींना सायकल त्याबरोबरच वर्षभर पुरतील इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. त्यामध्ये दप्तर, छत्री, स्वेटर, रेनकोट, शालेय गणवेशचे कापड आदी साहित्य आहेत. सतराहुन अधिक गावांतील हजारो मुला मुलींना या साहित्यांचा आधार मिळाला आहे.