बियाणे व खते पुरवठ्याबाबत गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा.

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गोंदिया,दि.15 :- आज 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात भात पिकाचे पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून धान पिकाच्या विविध चांगल्या वाणांचे बियाणेही जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी परमीटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परमीट प्राप्त करुन घ्यावेत. तसेच ग्राम बिजोत्पादन योजनेतूनही विविध उन्नत जातींचे बियाणे जिल्ह्यात परमीटद्वारे वितरण करण्यात येत आहेत त्यांचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यास आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. खतावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कृषि ॲप हे खताचे गणक यंत्र आपल्या ॲन्ड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा. धान पिकासाठी युरिया, डीएपी बिक्रेटचा वापर करावा अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्ह्यात यावर्षी युरिया खताचा 1980 मेट्रीक टनाचा बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. त्याचा कमाल मागणीच्या कालावधीत उपयोग करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी माती परिक्षणाच्या शिफारसीनुसार तसेच कृषिक ॲपचा वापर करुन रासायनिक खतांचा वापर करावा, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी करता येईल. बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर तालुका व जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाला माहिती दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.