ऑरेंज सिटी नागपूर बनली पिंक सिटी; केसीआर यांच्या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी बीआरएसचे झेंडे, बॅनर्स आणि पोस्टर्स
अबकी बार किसान सरकार
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर : – ऑरेंज सिटी अशी ओळख असलेले नागपूर आज (15 जून) पिंक सिटी झाली आहे.
त्याला कारण ठरला आहे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष (BRS) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांचा नागपूरचा अवघ्या पाच तासांच्या दौरा. केसीआरच्या या पाच तासांच्या दौऱ्यासाठी भारत राष्ट्र समितीने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले असून त्याच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या विविध योजना आणि त्यांची माहिती महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडण्यात आली आहे.
कसा आहे केसीआर यांचा नागपूर दौरा?
दुपारी एक वाजताच्या सुमारास केसीआर यांचा नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते लगेचच विवेकानंद नगर परिसरात बीआरएसच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळपासूनच या कार्यालयात तेलंगणामधून आलेल्या पुरोहितांकडून खास पूजा केली जात आहे. कार्यालयाचा उद्घाटन केल्यानंतर केसीआर सुरेश भट सभागृहात बीआरएसच्या मेळाव्याला संबोधित करतील. या मेळाव्यात विविध पक्षातील आणि संघटनेतील कार्यकर्तेमोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करतील असा दावा पक्षाकडून केला जात आहे. असे असले तरी सध्या तरी कुठल्याही मोठ्या नेत्याचा नाव बीआरएसमध्ये प्रवेशासाठी समोर आलेला नाही. मेळाव्यानंतर केसीआर चार वाजताच्या सुमारास नागपुरात पत्रकार परिषदही घेणार आहेत.
बीआरएसकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तेलंगणा सरकारच्या योजनांची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या बीआरएसने लक्ष केंद्रित केलं असून मराठवाड्यानंतर बीआरएस आता विदर्भावर लक्ष केंद्रित करत आहे. बीआरएसने शेतकऱ्यांना आपल्या प्रचारमोहिमेत लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बीआरएसला कसा प्रतिसाद मिळतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देऊन बीआरएस हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्वच पक्षांच्या व्होट बँकमध्ये मोठी गळती लावण्याच्या तयारीत आहे.चार दिवसांपूर्वी बीआरएस पक्षाने आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर वारकऱ्यांच्या स्वागताचे आणि प्रचाराचे मोठमोठे फलक लावले आहेत. आषाढी यात्रेला जवळपास 20 लाख भाविक एकाच गावात एकत्र येत असल्याने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न बीआरएसच्या टीमकडून केला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांचे भले मोठे बॅनर लक्ष वेधून घेत आहे.