कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी, ५ नवीन एसटी बसेस कर्जत आगारात दाखल..!

44

एसटी नुसते प्रवासाचे साधन नसून तिने अनेकांचे जीवन घडविले आहे – महेंद्र थोरवे आमदार

संदेश साळुंके,
कर्जत रायगड प्रतिनिधी 
मो: 9011199333

१४ जून : कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५ नवीन एसटी बसेस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या असून, या नव्या बसांचा लोकार्पण समारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते १४ जून रोजी सकाळी ११ वाजता भिसेगाव (कर्जत) येथील एसटी आगारात पार पडला.

या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार थोरवे म्हणाले, “एसटी ही केवळ प्रवासाची सुविधा नसून, ती सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार आणि वारकरी यांच्यासाठी एसटी ही जीवनरेषा आहे. कर्जत परिसरात ही सेवा अधिक सुलभ आणि वेळेवर मिळावी यासाठी मी वेळोवेळी शासन आणि एसटी महामंडळाशी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याचे फलित म्हणजे आज या पाच नव्या बस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या आहेत.”

या बसेस कर्जत, पनवेल, खोपोली, शहापूर, वाशी, तुळजापूर या परिसरात नियमितपणे धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह व नियमित सेवा मिळणार आहे. या उपक्रमात एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. भरत शेठ गोगावले आणि परिवहन मंत्री नामदार मा. प्रतापराव सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आमदार थोरवे यांनी नमूद केले.

“मी लहानपणापासून कर्जतचा एसटी स्टँड पाहतो आहे, मात्र आजही त्याच स्वरूपात आहे. आता या आगाराचे नूतनीकरण करून आधुनिक स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन स्वच्छतागृहे तत्काळ बांधण्यात येतील आणि आगाराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करून अंदाजपत्रक तयार करण्यात येईल,” असे आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले.

समारंभात विभाग नियंत्रक श्री. दीपक घोडे, आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक निरीक्षक महादेव पालवे, लेखाधिकारी अंकुश राठोड, अभिषेक सुर्वे, रोहित विचारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. सुनील जंगम यांनी विधिवत पूजन करून फीत कापून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार थोरवे यांनी प्रत्यक्ष नव्या एसटी बसमधून प्रवासाचा अनुभव घेतला. “१५–२० वर्षांनंतर पुन्हा एकदा लालपरीत बसण्याचा अनुभव मिळाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात विद्यार्थिनी सायली भोसले हिने आमदार थोरवे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “आज आमदार साहेबांच्या प्रयत्नातून कर्जतचा कायापालट होत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, विठ्ठल मूर्ती, संभाजी महाराज स्मारक अशा विविध उपक्रमांमुळे कर्जतचं वैभव वाढलं आहे.”

कार्यक्रमास किशोर कदम, दर्शन वायकर, गणेश देशमुख, हरिश्चंद्र छत्तीसकर, नागेश भरकले, महेंद्र साळवी, मेघा भरकले, अनुजा सुरावकर, संगीता शिरगरे, सुनीता फापाळे, मेघा कालवणकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ, एसटी कर्मचारी, चालक-वाहक आणि प्रवासी तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.