लोकाभिमुख महाराष्ट्र घडवणार : आदिती तटकरे
विविध उपक्रमांतून जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन साजरा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग,:- महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या एकमेव अजेंड्यावर राज्य शासन काम करत आहे. राज्याला देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि सर्वसमावेशक व्हिजन निश्चित केले आहे. आज आपण ज्या संधी आणि आव्हानांसमोर उभे आहोत, त्यावर मात करत एक स्थिर, समृद्ध, आणि लोकाभिमुख महाराष्ट्र घडवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांनी केले.
अलिबागमधील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर मार्गदर्शन करताना आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उप वनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदींसह वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले. पुढे त्या म्हणाल्या की, नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजन, जगातील अत्याधुनिक संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाच्या स्रोतात वाढ आणि विकास प्रकल्पांच्या गतीने पूर्णत्वासाठीचा पाठपुरावा या माध्यमातून भविष्यातील विकसित रायगड जिल्हा साकारला जाईल. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधा, रोजगार निर्मिती, ग्रामीण रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो, विमानतळ, जलमार्ग यांसारख्या सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिला जाणारा निधी हा केवळ खर्च नसून ती भविष्यासाठी केलेली गुंतवणूक बनली आहे.
जिल्हा बळकटीसाठी सहकार्य करा
शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करत आहे. हे अभियान केवळ स्पर्धात्मक नसून, ग्रामविकासाच्या लोकचळवळीला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल. गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे,आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा मुख्य उद्देश आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणा पुरती मर्यादित नसून, ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेली आहे. प्रत्येक गाव, पंचायत आणि नागरिकाने हे अभियान आपले समजून काम केले तर गावाचा चेहरामोहराच बदलू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी सक्रिय सहभाग नोंदवा. जिल्हा बळकट करण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन तटकरे यांनी केले.
कर्तृत्ववानांचा सन्मान
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अवयव दाते, पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परिक्षा 2025 प्रमाणपत्र, सैनिक नायक पदक (ताम्रपटांचे वितरण) 2025, नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे, आपत्ती प्रसंगी सहकार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती तसेच 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयाना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.