भयमुक्त तक्रारीसाठी ‘न्याय सारथी’
जिल्ह्यातील गुन्हेगारांना प्रणालीच्या मदतीने बसणार वेळीच चाप
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- भयमुक्त तक्रारीसाठी रायगड पोलिसांकडून आधुनिकतेची मदत घेण्यात आली आहे. आता पीडितांना भयमुक्त तक्रारीसाठी ‘न्याय सारथी’चा आधार मिळणार आहे. ‘न्याय सारथी’ ही प्रणाली पोलीस व नागरिक यांच्यामधील एक दुवा आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मित्राप्रमाणे ही प्रणाली काम करणार आहे. न्याय सारथी हॅलो एआय ॲपचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड पोलीस आणि सिमप्लरटुडे.एआय (Simplertoday.ai) यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय सारथी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. काही जणअन्यायाने त्रस्त आणि भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तसेच काहींना तक्रार कशा पद्धतीने द्यायची, याची माहिती नसते. त्याचा परिणाम गुन्हेगार अधिक बळावून भविष्यात गंभीर परिणाम करण्याची शक्यता असते. अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी रायगड पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली आहे. त्यासासाठी ‘न्याय सारथी’ ॲप सुरु करण्यात आला आहे. नागरिकांना होणारा त्रास, तसेच तक्रार कायदेशीर पद्धतीने, वेळेत पोलिसांकडे या प्रणालीचा वापर करून पोहोचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हेगाराला वेळीच चाप बसण्यास मदत होणार आहे.
अशी आहे प्रक्रिया!
न्याय सारथी प्रणालीचे क्युआर कोड पोलीस ठाण्यात तसेच सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी raigadpolice-simplertoday-ai ला भेट देणे. मोबाईल, लॅपटॉप, संगणकाचा वापर करून निःसंकोच व निर्भीडपणे घरबसल्या पीडित तक्रार सांगू शकतात, अशी व्यवस्था या प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. वेब पोर्टल स्वरुपात ही प्रणाली कार्यान्वित आहे. या प्रणालीवर पूर्णपणे सांगितल्यावर विनाविलंब नोंदणीकृत ईमेल व व्हॉट्सॲपवर तक्रारीची प्रत प्राप्त होणार आहे. ती तक्रारीची प्रत पोलीस ठाण्यात जमा झाल्यावर त्याची पोलीस ठाण्यामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे.