जीव धोक्यात घालून परिचारिकेने लिफ्टसमोरच केली काेरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती!

सुजाता मूनच्या धाडसाबद्दल सर्वीकढून होत आहे कौतुकाचा वर्षाव

‘ते’ हास्य मोठा पुरस्कार, सुजाता मून यांची भावना

नागपुर :- माणुसकीचा परिचय देत जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित महिलेची प्रसूती करीत एका परिचारिकेने बाळ आणि गर्भवतीचा जीव वाचवला. आता ही परिचारिका स्वत: गृह विलगीकरणात असून तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. सुजाता मून हे या परिचारिकेचे नाव आहे.
नंदनवन येथील निर्मलनगर येथे राहणाऱ्या सुजाता गेल्या सहा वर्षांपासून शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये त्यांचा नियमित राउंड सुरू होता. अचानक त्यांना दुसऱ्या मजल्यावरील लिफ्टजवळ महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला. तिची प्रसूतीची वेळ आली असल्याचे सुजाता यांच्या लक्षात आले. मात्र, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा पहिल्या मजल्यावर लिफ्टने घेऊन जाण्यासही वेळ नव्हता. नियमित राउंड असल्याने सुजाता यांनी पीपीई किटही घातलेला नव्हता. परंतु अशा वेळी त्या महिलेजवळ कसे जायचे याचा विचार न करता आई आणि बाळाचा जीव वाचवणे आवश्यक होते. त्यामुळे सुजाता यांनी जिवाची पर्वा न करता लिफ्टसमोरच प्रसूती केली.
आपले कर्तव्य चोख बजावल्याबद्दल मून या खऱ्या कोरोना योध्दा आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधीक्षिका वैशाली तायडे यांनी परिचारिकेचे कौतुक केले आहे.
भंडारा येथून आलेल्या या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. सातव्या महिन्यातच तिचे बाळंतपण झाल्याने बाळ वाचवणे गरजेचे होते. म्हणून तत्काळ बाळंतपण केले. गोंडस कन्यारत्न सुखरूप हातावर आले. ते पाहिल्यावर आई माझ्याकडे पाहून विलक्षण आनंदाने हसली. ते हसणे माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना सुजाता मून यांनी व्यक्त केली.
मंगळवारी करणार टेस्ट
पीपीई किट न घालताच सुजाता यांनी प्रसूती केल्याने त्या आता पाच दिवस गृह विलगीकरणात आहेत. मंगळवारी त्या कोरोना टेस्टसाठी स्वॅब देणार आहे. त्यानंतर टेस्ट निगेटिव्ह आल्यास रुजू होईन. पाॅझिटिव्ह आल्यास परत दहा दिवस घरी राहावे लागेल, असे मून यांनी सांगितले. प्रशिक्षणात आम्हाला जीव वाचवणे शिकवले जाते. महिला आणि बाळाचा जीव वाचवल्याने खूप समाधान मिळाले असे मून म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here