मी येतोय, झाली का तयारी…? गणेशभक्तांना बाप्पाची विचारणा

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी

गणेशभक्तांनो, मी ५ दिवसांनी तुमच्या घरी पाहुणचारासाठी येतोय, माझ्या आगमनाची आस तुम्हाला लागलेली आहे. मी पण माझ्या लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी आतूर झालेलो आहे. माझ्या स्वागताची तयारी सुरु केलीत ना, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यास सुरुवात केली का? पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली का? अशी विचारणा बाप्पाने केली आहे. सनईच्या सुरात, ढोल ताशांच्या गजरात माझे स्वागत होणार आहे, त्याची तयारी झाली का? अशी विचारणा बाप्पांना केली आहे.

गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरपासून घरोघरी होणार आहे. जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक ठिकाणी मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मुंबई, पुणे येथे नोकरीला असलेले चाकरमानीदेखील सुट्टी काढून हा उत्सव कुटूंबियांसमवेत साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. दीड दिवसांपासून एकवीस दिवसासाठीपाहुणा म्हणून येणाऱ्या गणरायाचा पाहुणचार थाटामाटात करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. घरोघरी गणेशमुर्ती आगमन होण्याबरोबरच वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीनेदेखील गणरायाचे स्वागत करण्याची तयारी आता सुरु झाली आहे. मंडप उभारणीपासून वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी कलाकारांसह अनेकांना आमंत्रित करण्याची तयारी सुरु झाली आहे.

The Biggest Amazon SALE LIVE Now…Click On The Banner To Get Discount Up To 50%

महामार्गावरील गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. चाकरमान्यांना मुंबई, ठाणे येथून आणण्यापासून त्यांना पुन्हा त्यांच्या निश्चित स्थळी पोहचविण्यासाठी तयारी केली आहे. हे मी मोठ्या आनंदाने पाहतोय, तुमचा उत्साह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उदंड असल्याचे मला पदोपदी जाणवतेय, असेही बाप्पाने म्हटले आहे.

कापडी फेटे, शेलेला पसंती

अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारात मूर्ती कला केंद्र सुुरू झाले आहेत. पीओपीच्या मुर्तींसह शाडूच्या मातीच्या मुर्ती बाजारात प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मुर्ती तयार करणे, मुर्ती सुकविणे, त्या व्यवस्थित ठेवणे तसेच काही ठिकाणी मुर्तींना रंगकाम करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. पेशवाई, डबल फेटेवाले, देवीचे रुप दाखविणारी मुर्ती, गटू फेटेवाले, तुरेवाले अशा अनेक वेलवेट, कॉटन, कापडी फेट्यांचा क्रेझ वाढला आहे. या कापडी फेट्याला गणेश भक्तांकडून मागणी असल्याचे मुर्ती विक्रेत्या जान्हवी आग्रवाल यांनी सांगितले.

ब्राह्मणी बैठक असलेल्या मुर्तींसह वेगवेळ्या प्रकारच्या दीड फुटापासून मूर्ती विक्रीला उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. गणेशमूर्ती, आरास सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तु दाखल झाल्या आहेत. बाजारपेठा वेगवेगळ्या वस्तूंनी फुलु लागल्या आहेत. सजावटीसाठी लागणारे विविध प्लास्टीकची फुले, माळा, डायमंड लेस, रंगीत लेस, झालर, मयरपी खडे, लटकन, मोती, कंठी, माळा, फुलांच्या माळा, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. गणरायाचे आगमन होण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन घरोघरी होणार असल्याने गणेशमूर्ती सजावटीचे नियोजन करण्यास गणेशभक्तांनी सुरुवात केली आहे. तयार असलेले डायमंडलेस, रंगीत लेस, भिगबाळी, लटकनसह मोती कंठी माळांचा क्रेझ यंदा वाढलेला आहे.

कृत्रिम फुलांची क्रेझ

आरास सजावटीसह, स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम झालर, बुके, मखमल फुले, मोगरा, झेंडूच्या फुलांच्या माळांसह सुटी फुलेदेखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ही कृत्रिम फुलांना मागणी अधिक असल्याचे विक्रेते विशाल चौरासिया यांनी सांगितले आहे. वेगवेगळ्या कृत्रिम फुले, सजावट साहित्य 40 रुपयांपासून साडेसात हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे चौरासिया म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here