थर्माकोलच्या वापर केल्यास होणार दंड, प्रदूषण मंडळाची धडक कारवाई

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी

थर्माकोलवरील बंदीनंतरही काहीजण स्वस्त असलेल्या थर्माकोलचा वापर सजावटीसाठी करीत असल्याने प्रदुर्षण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई सुरु केली आहे. थर्माकोलचा सर्वाधिक वापर गणेशोत्सवामध्ये मखरांसाठी केला जातो. मागील सात वर्षाच्या बंदीनंतरही अद्याप साधारण ४० टक्के थर्माकोलचा वापर केला जात असण्याने यावर निर्बंध आणण्यासाठी प्रदुर्षण नियंत्रण मंडळ प्रयत्न करीत आहे. 

थर्माकोलची विक्री करताना कोणी आढळल्यास त्यावर प्रदुर्षण प्रतिबंधक कायद्यानुसार 5 हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा विक्री करताना आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड होणार आहे. सततच्या जनजागृतीनंतर अद्याप ४० टक्के थर्माकोलचा वापर होत असल्याचे प्रदुर्षण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदुर्षण नियंत्रण मंडळाने आता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कारवाईचा वेग वाढवला आहे. राज्य शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणल्याने गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पर्यावरणपूरक मखरांचा पर्याय निवडला आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून कागदी लगदा आणि पुठ्ठय़ापासून, फोमपासून तयार केलेल्या मखरांचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. ग्राहकांमध्येही पर्यावरण पुरक मखरांबाबत जनजागृती झाल्याने इकोप्रेंडली मखरांना मागणी वाढत चालली आहे. अशा मखरांचे विघटन सहज होते. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांत अशा मखरांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. तरीही काही विक्रेते थर्माकोलची विक्री करीत असल्याचे आढळून येत असल्याने प्रदुर्षण नियंत्रण मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई सुरु केलेली आहे. 

पर्यावरणाला हानीकारक

थर्माकोलचा वापर सजावटीसाठी प्रामुख्याने वापर केला जातो. थर्माकोलचे पाण्यात विघटन होत नाही. जाळल्यानंतर थर्माकोलपासून दुर्गंधी येते. नदी-नाल्यात ते तसेच पडुन राहिल्याने पाणी तुंबून राहण्याचे प्रकार वाढतात. ग्रामपंचायती, नगरपालिकांना दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्च केला जातो. पावसाळ्यात पूर येणे, शहरात पाणी तुंबून राहण्याचे प्रकार घडत असल्याने राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह थर्मकोलच्या वापरावर बंदी आणली आहे. याची अंमलबजावणी मागील सात वर्ष केली जात आहे. 

पर्यावरणपुरक मखरांना पसंती

पर्यावरणाला हानी पोहचणार नाही यासाठी मखर तयार करताना पुठ्ठा, लाकूड, लाकडाचा भुस्सा, कागदाचा लगदा, काच, नारळाच्या झावळ्या, करवंट्या, बांबू, पीव्हीसी बोर्ड, सुगंधित फुले, बांबू आदींचा वापर करून मखर बनविले जातात. यावर अॅक्रेलिक रंगाचा वापर केला जातो. जलरंगाचाही काही प्रमाणात वापर केला जात असून या मखरांसाठी लागणारे साहित्याचे लगेच विघटन होते. या वस्तु आसपास मिळत असल्याने मखर तयार करण्याचा खर्चही ग्राहकांच्या अवाक्यात असतो, असे मखर बनविणारे श्रीरंग पाटील यांचे म्हणणे आहे.   

थर्माकोलच्या विक्रीवर राहणार नजर

बंदी असल्याने थर्माकोलच्या विक्रीतही काळाबाजार होऊ लागला आहे. काही व्यापाऱ्यांनी चोराटी मार्गाने थर्माकोलच्या शीट आणल्या असून त्याची विक्री चढ्या दराने केली जात आहे. असा साठा करुन विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. प्रदुर्षण नियंत्रण मंडळाने तशा सुचनाच स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. यातून औद्योगिक कारणासाठी आणलेल्या थर्माकोलला सुट देण्यात आलेली आहे. 

शासनाने कुठल्याही प्रकारच्या थर्माकोलला परवागनी दिली नाही. जर एखादा व्यापारी थर्माकोलची विक्री करीत असल्यास त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला करावी. प्रदुर्षण टाळण्यासाठी थर्माकोलचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे. हे आपल्या सर्वांचेच फायद्याचे आहे. सातत्यपुर्ण जनजागृतीमुळे थर्माकोलचा वापर कमी झालेला आहे; मात्र, त्याचा वापर पुर्णपणे थांबलेला नाही. यासाठी सर्वांचेच सहकार्य गरजेचे आहे – राज कामत, प्रादेशिक अधिकारी प्रदुर्षण नियंत्रण महामंडळ

आम्ही मागिल पंधरावर्षापासून मखर विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. सुरुवातीला थर्माकोलच्या मखरांचे प्रमाण खूपच जास्त होते. दिसायला आकर्षक आणि त्यापासून कलाकृती करणेही सोपे असल्याने थर्माकोलच्या मखरांच्या किंमतीही कमी असायच्या. बंदी नंतर सततच्या जनजागृतीमुळे हे प्रमाण मागील तीन वर्षात खूपच कमी झालेले आहे. आम्ही असे मखर विक्रिला ठेवतच नाही. ग्राहकांमध्येही पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजू लागले आहे, असा आमचा अनुभव आहे – सुशांत पाटील, सुंदरम मखर

इको फ्रेंडली मखरांच्या किंमती जास्त आहेत. परंतु आणखी काही वर्ष वापरता येण्यासारखे ठिकाऊ असतात. त्यामुळे तीन-चार वर्षासाठी एकदा खर्च करताना काही वाटत नसावे. त्यामध्ये छोटे दिवे सोडलेले असतात, त्यामुळे हे मखर दिसायला खूपच आकर्षक असतात. पुर्वी कुटुंबातील सर्वजण एकत्र येत मखर तयार करीत असत, आता सर्वजण आपआपल्या कामात गुंतलेले असल्याने जास्त वर्ष ठिकणारे इको फ्रेंडली मखर सोयीचे ठरतात – मेघा पाटील, ग्राहक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here