सुप्रसिद्ध नाटककार सुभाष रुक्मिणी नारायण यांचे आकस्मिक निधन

गुणवंत कांबळे मुंबई नगर प्रतिनिधी
मुंबई : -सांस्कृतिक चळवळीतील एक महत्वाचे शिलेदार, सामाजिक जाणिवेचे कलाकार,जाती धर्माच्या पलीकडे मानवतावादी दृष्टिकोन बाळगणारे आणि आपल्या प्रत्येक कृती आणि कलाकृतीतून तो मांडणारे प्रायोगिक रंगभूमीवरील महत्त्वाचे नाटककार सुभाष रुक्मिणी नारायण यांचे १४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२:३० वाजता आकस्मिक निधन झाले.
त्यांचा वाशी येथे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाला होता . त्यांना गंभीर जखमी अवस्थेत डी.वाय.पाटील रुग्णाल,नेरुळ नवी मुंबई इथे आय.सी .यू. मध्ये दाखल करण्यात आले होते.पण मृत्यशी १९ दिवस चाललेली त्यांची झुंज अखेर १४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२:३० वाजता संपली.त्याच रात्री त्यांच्या गावी सांगोला, सोलापूर इथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या जाण्याने प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघणं कठीण आहे.
त्यांच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी सिद्ध आर्ट,भारतीय लोकसत्ताक संघटना ,मैत्रेय संघ आणि मित्र परिवार यांच्या वतीने रविवार,दिनांक २१ नोव्हेंबर सायं.५ वाजता लोकसत्ताक स्टडी सेंटर,सरदार नगर नं. ४ इथे आदरांजली आणि अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा तपास पोलिस अजूनही करत आहेत.