बाळ चोरी करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याला कोटा इथून अटक 

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं

मो 9096817953

कळमना परिसरातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करुन दोन लाख 29 हजार रुपयांत विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बालाघाट इथून अटक केली.त्याच्यासोबतच कळमना पोलिसांनी बाळ चोरी करणाऱ्या प्रजापती दाम्पत्यालाही कोटा इथून पकडले. लवकरच तिघांनाही नागपूरला आणण्यात येईल. बाळ चोरी आणि विक्री करणाऱ्या या टोळीची म्होरक्या श्वेता रामचंद्र सावले उर्फ श्वेता मकबूल खान (वय 43 वर्षे) नावाची महिला आहे. ती यापूर्वीही मानवी तस्करीच्या प्रकरणात सापडलेली आहे.

गुरुवारी (10 नोव्हेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिखली झोपडपट्टीत राहणाऱ्या राजकुमारी राजू निशाद यांचे आठ महिन्यांचे बाळ अचानक गायब झाले. शेजारी राहणारे योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिता प्रजापती बाळाला फिरवून आणण्यासाठी आणि खाऊ घेऊन देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेले होते. मात्ररात्रीपर्यंतही दोघेही मुलाला घेऊन परत आले नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अपहरणकांड समोर येताच पोलिस तपासाला लागले. गुरुवारी रात्रीच पोलिसांनी फरजाना उर्फ असार कुरेशी (वय 40 वर्षे) रा. कुंदनलाल गुप्तानगर, सीमा परवीन अब्दुल रउफ अंसारी (वय 38 वर्षे) रा. विनोबा भावेनगर, बादल धनराज मडके (वय 35 वर्षे) रा. भोसलेवाडी, लष्करीबाग आणि सचिन रमेश पाटील (वय 45 वर्षे) रा. इंदोरा मॉडल टाऊनला अटक केली. त्यांच्या माध्यमातून बाळ खरेदी करणाऱ्या दाम्पत्यापर्यंत पोहोचले.

आरोपींकडून 2.29 लाख रुपये जप्त

बाळाला आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यात आले, मात्र या घटनेमागचे मुख्य सूत्रधार श्वेता खान आणि प्रजापती दाम्पत्य फरार होते. गुन्हे शाखेचे मानव तस्करी विरोधी पथक श्वेताच्या मागे लागलेले होते. शनिवारी (12 नोव्हेंबर) तिला बालाघाटच्या लालबर्रा इथून अटक करण्यात आली. झडतीमध्ये तिच्याजवळ 2.29 लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन मिळाला. तिला अटक करुन नागपूरला आणण्यात आले. तर कळमना पोलिसांचे दुसरे पथक प्रजापती दाम्पत्याच्या मागावर होते. पोलिसांनामाहिती मिळाली की, दोघेही राजस्थानच्या कोटा शहरात जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी कळमना पोलिसांनी दोघांनाही कोटातून अटक केली. आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. आधी पकडलेल्या चार आरोपींना न्यायालयाने 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here