पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या सामाजिक उपक्रमांतर्गत शाळांचे डिजिटल सक्षमीकरण ११ शाळांना १०० संगणक संच वाटप…..
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ११ शाळांना एकूण १०० संगणक संचांचे वाटप केले आहे. यामध्ये १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे.
उद्घाटन समारंभ माणगांव येथील एस.एस. निकम इंग्लिश स्कूल या शाळेत आयोजित केला गेला, या कार्यक्रमात कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री.इन क्यो बे, संचालक श्री. सिओंग डेओक कांग, प्रशासन विभाग प्रमुख श्री. महेंद्र तट्टे, शाळा संस्थापक डॉ. निकम, प्रा. संगीता कोकाटे तसेच इतर शिक्षकगण व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्त्व, त्याचे शैक्षणिक उपयोजन आणि भविष्यातील करियरच्या संधींविषयी मार्गदर्शन देण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संगणकावर वेगवेगळ्या (मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल) टूलमध्ये आपले नाव कसं लिहायचं, अक्षरांचे फॉरमेटिंग, वेगवेगळे आकार कसे काढायचे या गोष्टी शिकवल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये उमटलेला आनंद आणि नवीन संधींची चमक पाहून, या उपक्रमाच्या यशस्वितेची झलक मिळाली.
या प्रसंगी बोलताना श्री. इन क्यो बे म्हणाले, “आधुनिक काळात डिजिटल शिक्षण महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये संगणक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगाची जवळून ओळख करण्याची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरेल. पोस्को महाराष्ट्र स्टीलला आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला हातभार लावण्याचा अभिमान आहे.”
हा उपक्रम शिरवली, कडापे, कांदळगाव, भाले, निजामपूर, साई, उतेखोलवाडी, माणगांव, पाटणूस, विळे या गावांतील शाळांमध्ये राबवण्यात आला. या उपक्रमाला स्थानिक समुदायाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. शाळांमधून संगणकांच्या उपयोगाने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानाची रुची वाढणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता होती, असे शिक्षणतज्ञांनी नमूद केले. या संगणकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञानाची गोडी लागेल आणि भविष्यातील तंत्रसाक्षर नागरिक बनण्यासाठी त्यांना महत्त्वाचे सहकार्य मिळेल.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बदल घडवून आणण्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टीलने घेतलेला पुढाकार हे ग्रामीण भागातील शाळांसाठी एक नवचैतन्य आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टील नेहमीच तत्पर आहे.