जीवनाचे खरे शिल्पकार ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार!

50

जीवनाचे खरे शिल्पकार ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार!

मीडिया वार्ता वृत्तसेवा

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करताना आनंद होत आहे. त्यांनी जगामध्ये भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे, ज्या प्रकारची शिल्प त्यांनी तयार केली आहेत ती अतुलनीय आहेत. तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् ते सरकारी नोकरी व नंतर पुरातत्व खात्यात शिल्प जोडण्याचे व शिल्प निर्माण करण्याचे काम राम सुतार यांनी केले, असे सांगून त्यांच्या जीवनाचा प्रवास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी जवळ जवळ 77 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो शिल्प तयार केली, देशातले असे कुठले राज्य नाही की, जिथे राम सुतार यांनी तयार केलेले शिल्प नाही. जगातील किमान 15 देश असे आहेत की ज्या ठिकाणी राम सुतार यांनी तयार केलेली शिल्प अभिमानाने उभी आहेत. ज्या दगडाचे ते शिल्प तयार करतात, त्याला आकार देतात, त्याला प्रतिरूप देतात, तेव्हा त्या शिल्पातून ती व्यक्ती प्रत्यक्ष साकार होते, असे बोलून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले.

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प, स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी हे पुतळे निर्माण करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या कार्याचा हा वारसा पुढची 200-400 वर्ष या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देत राहील. राम सुतार यांच्या सृजनशीलतेचा आविष्कार त्यांच्या कलेच्या माध्यमातून पाहायला मिळतो याचा आनंद आहे. तसेच राम सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.