अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पळवून नेणाऱ्या आरोपीला ओडीसातून अटक

106

अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पळवून नेणाऱ्या आरोपीला ओडीसातून अटक

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल : कामोठे परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या आरोपीच्या कामोठे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला ओडीसा येथून मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका केली आहे. तसेच तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे.
मुन्ना रविशंकर प्रधान (२१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कामोठे परिसरात आई-वडिलांसोबत राहणारी पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. याच भागात कामानिमित्त राहणाऱ्या मूळच्या ओडीसा राज्यातील मुन्ना प्रधान याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाचा फायदा घेत आरोपी मुन्ना प्रधान याने संधी साधून या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला पळवून नेले होते. घरातील मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी तांत्रिक कौशल्याने लावला छडा पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी मुन्ना प्रधानवर संशय व्यक्त केला होता, कारण ती त्याच्यासोबत संपर्कात होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी मुन्ना प्रधानचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आरोपीचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याच्या ठावठिकाणा मिळत नव्हता. मात्र, पोलिसांनी तपास सुरू ठेवला असतानाच, अचानक त्याचा फोन सुरू झाला आणि त्याचे ओडीसा येथील लोकेशन पोलिसांना मिळाले. ओडीसातून आवळल्या मुसक्या मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे व त्यांच्या विशेष पथकाने तात्काळ ओडीसाकडे धाव घेतली. तिथे त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत आरोपी मुन्ना रविशंकर प्रधान याला अटक करून पनवेल येथे आणले. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपी मुन्ना प्रधान याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत कामोठे पोलिसांनी आरोपी मुन्ना प्रधान याच्या विरोधात अपहरणासह बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.