मंगळवेढा उमेदवारावर खुनी हल्ला, माजी उपसभापतीसह नऊजणांवर गुन्हा दाखल.

57

मंगळवेढा उमेदवारावर खुनी हल्ला, माजी उपसभापतीसह नऊजणांवर गुन्हा दाखल.

मंगळवेढा:- तालुक्यातील नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज माघारी का घेतला नाही, याचा राग मनात धरून नंदेश्वर येथे उमेदवाराच्या पती व दिरास गंभीर स्वरूपात मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर घडली.

या प्रकरणी माजी उपसभापतीसह आठजणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद छाया गरंडे यांनी दिली असून, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया गरंडे या नंदेश्‍वर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग दोनमधून उमेदवार म्हणून उभ्या होत्या.

त्यांनी दाखल केलेला अर्ज माघारी घ्यावा म्हणून 2 जानेवारी रोजी माजी उपसभापती दादा गरंडे यांनी त्यांच्या घरी जाऊन तुमचा अर्ज काढून घ्या, नाही तर तुमचे खरे नाही अशी धमकी दिली होती.

परंतु या प्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केली नव्हती.परंतु, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रात समोरून उमेदवाराचे पती व दीर जात असताना माजी उपसभापती दादा गरंडे, माजी सरपंच बाळू गरंडे, केराप्पा गरंडे, अंकुश गरंडे, मायाप्पा गरंडे, तायाप्पा गरंडे, ज्ञानू गरंडे, रमेश गरंडे, नामदेव गरंडे हे हातात काठ्या घेऊन आले.

उमेदवाराच्या पतीस शिवीगाळ करत तुम्हाला अर्ज मागे घ्या म्हणून सांगूनही तुम्ही अर्ज मागे घेतला नाही असे म्हणत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करू लागले. त्यातील केराप्पा गरंडे यांनी दिराच्या कपाळावर चाकू धरला. त्यातील काहींनी लोखंडी गजाच्या साह्याने मारहाण केली तर काहींनी शिवीगाळ केली.

दरम्यान, काहींनी हे भांडण सोडवण्यासाठी जात असताना सर्वजण पळून गेले. जाता जाता आता तुम्ही वाचला आहात नंतर बघून घेऊ’अशी धमकी दिली.

दरम्यान, छाया गरंडे यांचे पती व दीर बेशुद्ध पडले. नातेवाइकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. यातील दोघा संशयित आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी दिली.