लाडबोरी येथील विविध सहकारी संस्थेच्या शिपाई पद भरतीमध्ये गैरप्रकार
संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलाचीच जाणीवपूर्वक निवड
निवड प्रक्रिया रद्द करण्याची कमलाकर कामडी यांची मागणी.
जितेंद्र नागदेवते
*सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो 8806689909 :-
सिंदेवाही :- आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लाडबोरी र. न.१२०३ या संस्थेमध्ये शिपाई पद रिक्त झाले असल्याने संस्थेमार्फत शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सदर भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार करून संस्थेच्या अध्यक्षांच्या मुलाचीच निवड करण्यात आली असल्याने सदर निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर कामडी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लाडबोरी येथील शिपाई पद भरती संदर्भात २४ /१२/२०२४ रोजी वर्तमान पत्रातून जाहिरात काढून ३०/१२/२०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले . आणि ३/१/२०२५ रोजी अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्षांनी मुलाखत घेऊन अध्यक्षांचे सुपुत्र यांची थेट निवड केली असल्याचे तोंडी घोषित केले आहे. शिपाई पद भरतीसाठी एकूण पाच अर्ज आले होते. मात्र अर्जांची कोणतीही छाननी केली नाही. नोटीस बोर्डवर जाहिरात लावण्यात आलेली नाही. पात्र, अपात्र अर्जदारांची यादी नोटीस बोर्डवर लावण्यात आली नाही. पात्र उमेदवारांना कोणतीही मुलाखतीची नोटीस न देता सर्वांना मोबाईल वरून मॅसेज देण्यात आला. विशेष म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा न घेता केवळ मुलाखतीवर निवड करण्यात आली . संस्थेमध्ये अध्यक्षांचे नातेवाईक संचालक म्हणून कार्यरत असून मुलाखतीच्या दिवशी अध्यक्ष हे जाणीवपूर्वक गैरहजर राहून उपाध्यक्षाना हाताशी घेऊन त्यांचे मार्फत मुलाखती घेण्यास भाग पाडले. आणि अध्यक्षांच्या मुलाची शिपाई म्हणून निवड झाली असल्याचे घोषित केले असल्याचा आरोप लाडबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर कामडी यांनी केला आहे. सदर पदभरती मध्ये गैरप्रकार झाला असून अध्यक्षांच्या अनुपस्थितीत मुलाखती घेऊन निवड करण्यात आली असल्याने सदर निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच संस्थेचे सचिव यांनी पदभरती बाबत शासनाच्या परिपत्रकानुसार प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे त्यांचेवर सुद्धा योग्य कारवाही करण्यात यावी. अशी मागणी कमलाकर कामडी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.