यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रदेश च्या सहसंघटक पदी श्री एकनाथराव कनाके यांची नियुक्ती
*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*
चंद्रपूर : -आज दिनांक 15 मार्च 2022 रोजी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त तथा प्रतिष्ठाणाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील डॉ आंबेडकर भवनात भव्यदिव्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सूर्यकांत गवळी, माजी कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष, ग्राहक कल्याण सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य यांनी सुरवातीला राज्य समिती ची आढावा बैठक घेतली. व तद्नंतर “जागो ग्राहक जागो” या संकल्पनेवर आधारित उपस्थित सदस्य व पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन व मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थितांना सबोधतांना श्री एकनाथराव कनाके म्हणाले की, ग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणी फसगत करणार नाही.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही. मुख्यतः बँकेचे कर्ज घेतांना प्रोसेसिंग फी म्हणून ग्राहकाकडून उकळीत असलेले अधिकचे पैसे, सोने रिसेल करतांना त्याचा व्यापारी कडून अत्यंत कमी दारात आकारलेला भाव तसेच माहितीचा अधिकार अधिनियम व दप्तर दिरंगाई कायदा अन्वये प्रत्येक शासकीय कार्यालयात लावलेल्या नागरिकांच्या सनदेचे रोज होत असलेले उल्लंघन या विषयावर यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानाने चळवळ उभी करून ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. संतोषकुमार जयस्वाल Phd न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांनी कायद्याच्या कक्षेत ग्राहक चळवळ कशी राबविली पाहिजे या बाबत प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सूर्यकांत गवळी यांनी प्रतिष्ठाणची महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारणी घोषित केली ज्यात चंद्रपूर येथील श्री एकनाथराव कनाके यांना यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रदेश च्या सहसंघटक पदी नेमणूक करण्यात आली. व संपूर्ण महाराष्ट्रात यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाणची कार्यकारणी निर्माण करून “जागो ग्राहक जागो” चळवळ समृद्ध करण्याची जवाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेमणुकीने परिसरातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.