बीड मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा खदाणीच्या तलावात बुडुन मृत्यू.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रातिनिधी✒
बीड,16 एप्रिल:- बीड जिल्हात एक खळबळजनक मन हेलावणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड पासुन जवळच पांगर बावडी च्या अलीकडे नाळवंडी रस्त्यावर असलेल्या खदाणीच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. अथक परिश्रमानंतर पोलिसांना तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यश आलं आहे.
बीड शहरातील गांधी नगर येथे राहाणारे मयूर राजू गायकवाड, ओंकार गणेश जाधव, शाम सुंदरलाल देशमुख आणि अन्य एक जण बीड-नाळवंडी रोडवरील नखातेच्या खदाणीतील तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यादरम्यान या तिघांचाही खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर या तिघांचेही वय 17 ते 20 दरम्यान असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस पुढीस तपास करत आहेत.
बीड शहराजवळील नाळवंडी रोडवर पांगरबावडी शिवारातील खदाणीत काही तरुण पोहोण्यासाठी गेले होते. हे सर्व बीड शहरातील गांधी नगर येथील रहिवाशी आहेत. सायंकाळी 4 च्या सुमारास पोहण्यासाठी खदाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाइकांनी अक्षरशः हंबरडा फोडला आहे. गांधीनगर भागात शोककळा पसरली आहे.