‘पर्जन्य जलसंधारण’ प्रत्येकाचे कर्तव्य…!

63

शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पाणी वाचवायला शिकवा, अन्यथा… पाण्यासाठी दाही दिशा

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो:९९२२५४६२९५

भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी पाऊस उशिरा येईल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो खरा ठरताना दिसत आहे. ७ जूनला महराष्ट्रात दाखल होणारा मान्सून १५ जून ओलांडला तरी दाखल झाला नाही. पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. पाऊस लांबला की पेरण्या लांबतात आणि पेरण्या लांबल्या की बळीराजाचे पुढील सर्व नियोजन कोलमडते. राज्यात अद्याप पाऊस न सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा संपत आला आहे जर पाऊस असाच लांबला आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर पुढील वर्षी आपल्याला पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागेल.

गेल्या काही वर्षात राज्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी दाही दिशा…. अशी लोकांची अवस्था झाली होती. आता यावर्षी पुन्हा एकदा हवामान खात्याने तशीच शक्यता वर्तवली असल्याने पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि वापर करावा लागणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाच्या जास्तीतजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेचसे पाणी वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या भागात तर हा पाण्याचा अपव्यय होय.

https://mediavartanews.com/2023/06/13/amazon-forest-helicopter-accident-latest-update/

महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे आणि पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा पाणी जिरवण्याचा फायदा असा की भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यात घट होत नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ धरणे बांधून, पाईपलाईन शहरापर्यंत नेऊन घरोघरी पाणी पोहचवणे असा नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व पटवून देणे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवे.

यासंदर्भात नागरिकांचेही प्रबोधन व्हायला हवे. नदी, विहीर, तलाव, बंधारे यात पावसाचे जास्तीतजास्त पाणी कसे साठेल याचे नियोजन सरकारी पातळीवर व्हायला हवे. नागरिकांनी आपल्या घरात, सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. शाळा, कॉलेज तसेच सरकारी कार्यालयातही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात, सोसायटीत, कार्यालयात झाले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे कारण ती काळाची गरज आहे. दुष्काळापासून वाचायचे असेल तर पर्जन्य जलसंधारण करावेच लागेल.

 [yotuwp type=”videos” id=”fPPSoiJP1jo” thumbratio=”169″]