खेळ कुणाला दैवाचा कळला…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

मराठी चित्रपट सृष्टीतील आजवरचा सर्वात देखणा नायक, मराठीतील विनोद खन्ना अशी बिरुदावली लागलेला, सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील मराठी मुलींच्या स्वप्नातील राजकुमार, मराठीतील सुपरस्टार, जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. तसे त्यांचे निधन वयाच्या ७७ व्या वर्षी झाले म्हणजे वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका सदनिकेत त्यांचा मृत्यू झाला हे ऐकून सर्वच जण हळहळले. त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे जितका धक्कादायक आहे तितकेच ते मनाला चटका लावून जाणारेही आहे. ज्यांचे आयुष्य प्रेक्षकांच्या गराड्यात गेले त्यांना अशाप्रकारे एकाकी मरण यावे हा दैवाचा अजब खेळ म्हणावा लागेल. त्यांच्याच देवता चित्रपटातील ‘खेळ कुणाला दैवाचा कळला….’ हे गाणे या निमित्ताने सर्वांना आठवले.

अर्थात आयुष्यभर स्टारडम मिळवूनही अशाप्रकारे एकाकी शेवट झालेले रवींद्र महाजनी हे पहिले कलाकार नाहीत याआधी जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार, दक्षिणेतील सिल्क स्मिता, हिंदी चित्रपटातील नायिका परवीन बाबी, बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवी या कलाकारांचा शेवट देखील अशाच प्रकारे चार भिंतीच्या आत झाला. पैसा आणि प्रसिद्धीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या या कलाकारांना उतार वयात पैसा आणि प्रसिद्धी खरंच कामी येतात का….? याचा प्रत्येक कलाकारांनी करायला हवा अर्थात हा विचार फक्त कलाकारांनीच नव्हे तर सर्वांनीच करायला हवा.

स्टारडम, पैसा, प्रसिद्धी, सत्ता हे सगळं क्षणभंगुर आहे. खरंच ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ हेच अंतिम सत्य आहे. रवींद्र महानजी यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९४९ रोजी बेळगाव येथे झाला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेच्या स्नेहसंमेलनात ते आपल्या अभिनयाची हौस भागवून घेत. शालेय जीवनातच ते नाटकात काम करू लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी ते मुंबईत आले. मधुसूदन कालेलकर यांनी त्यांना जाणता अजाणता या नाटकात पहिली संधी दिली. या नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना झुंज चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आणि त्यातील त्यांची भूमिका खूप गाजली आणि मराठी चित्रपट सृष्टीला नवा सुपरस्टार लाभला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अभिनय केलेले सर्वच चित्रपट गाजले. यात आराम हराम है!, लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

आजही दूरदर्शनवर हे चित्रपट लागले तर प्रेक्षक आवडीने पाहिले. या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. त्यांनी अनेक नाटकातही भूमिका केल्या, बेलभांडार अपराध मीच केला या नाटकातील भूमिका खूप गाजल्या. त्यांनी काही चित्रपट आणि नाटके देखील दिग्दर्शित केली. ९० च्या दशकात काही टीव्ही वरील मालिकेतही त्यांनी भूमिका केल्या. काही मालिका दिग्दर्शित केल्या. मधल्या काळात ब्रेक घेऊन अलीकडे त्यांनी काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, पानिपत या चित्रपटात चरित्र नायकाच्या भूमिका केल्या . त्यांच्या अभिनय कलेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीने एक राजबिंडा नायक गमावला. रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here