राजकीय हिंसाचाराचे बळी…
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
कार्यकर्तेच पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आमने सामने होते. या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली मात्र ही निवडणूक गाजली ती हिंसाचाराने. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात हिंसक आंदोलने झाली. गावागावातील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांपुढील आव्हान वाढले.
या निवडणुकीत हिंसाचार इतका वाढला की दोन्ही कडील सुमारे ४० हुन अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आणि शेकडो कार्यकर्ते जखमी झाले अर्थात पश्चिम बंगालला राजकीय हिंसाचार हा नवा नाही. याआधी पश्चिम बंगालमध्ये जेंव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेंव्हाही असाच हिंसाचार उसळला होता त्यावेळी तर थेट बॉम्बचा वापर झाला होता. तेंव्हाही अनेक कार्यकर्ते मरण पावले होते. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आणि हिंसाचार हे जणू समीकरणच बनले आहे. हिंसाचाराशिवाय पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होतच नाही. दोन दशकांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस हे दोन मुख्य पक्ष होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हा सत्ताधारी पक्ष तर काँग्रेस हा विरोधी पक्ष असायचा तेंव्हा देखील निवडणुकीत असाच हिंसाचार व्हायचा. कम्युनिस्ट आणि काँग्रेस कार्यकर्ते निवडणुकीत समोरासमोर यायचे आणि त्यांच्यात रक्तरंजित हिंसाचार व्हायचा. तेंव्हाही हिंसाचारात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते धारातीर्थी पडत आता पक्ष बदलले मात्र निवडणुकीतील हिंसाचार मात्र कमी झाला नाही उलट वाढतच गेला आहे.
यावर्षी तर कहरच झाला. मागील सर्व हिंसाचाराचा रेकॉर्ड यावेळी तुटला. अर्थात या हिंसाचारात आजवर कधीही नेत्यांचा मृत्यू झाला नाही. निवडणुकी दरम्यान होणाऱ्या या रक्तरंजित हिंसाचारात कधी मोठ्या नेत्यांचा, मंत्र्यांच्या किंवा आमदार खासदारांचा मृत्य झाल्याची घटना घडली नाही. राजकीय हिंसाचारात कायम बळी जातो तो कार्यकर्त्यांचा. कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी मरण पत्करतात. त्यांची कुटुंबे उघड्यावर येतात. नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे कुटुंबाचे सांत्वन केले जाते त्या नंतर मात्र या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जाते. विशेष म्हणजे हा हिंसाचार फक्त निवडणुकीच्या काळातच होतो. निवडणुका संपल्या की हिंसाचार देखील संपतो मात्र दोन्ही कडील कार्यकर्त्यांमधील खुन्नस मात्र संपत नाही. निवडणूक संपली तरी कार्यकर्त्यातील शत्रुत्व संपत नाही. इकडे नेते मंडळी मात्र एकत्र येतात. निवडणुकीनंतर सत्तेसाठी ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. जणू काय काही घडलेच नाही अशा आविर्भावात वावरतात.
सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षात आणि विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात. सत्तेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठा बदलतात. स्वतःचा फायदा असेल त्यावेळी नेत्यांना कार्यकर्ते दिसत नाही मात्र निवडणुकीत जिंकून येण्यासाठी याच कार्यकर्त्यांचा ढाल म्हणून वापर केला जातो. हिंसाचारासाठी कार्यकर्त्यांचा वापर केला जातो आणि या हिंसाचारात जीव जातो तो कार्यकर्त्यांचा त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण नेत्यांच्या कितपत नादी लागावे हे ठरवावे. नेते लोक कार्यकर्त्यांचा फक्त वापर करतात हे ओळखून कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देण्यापेक्षा आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी त्याग करावा. राजकीय नेत्यांच्या नादी लागून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देणे कितपत योग्य आहे ? याचा विचार सर्वच पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी करायला हवा.