रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. “भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.









