बीड जिल्हात प्रकल्प प्रेरणा विभागात भष्ट्राचार, कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश.

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड :- जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लातूरचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना या प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटीच्या नावाखाली 12 लाखांची उधळपट्टी करणे अंगलट आले आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे. येथे डॉ. सुदाम मोगले या मानसोपचार तज्ज्ञासह चार ते पाच कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु मागीत तीन वर्षांत त्यांनी 388 पैकी केवळ 53 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली, तसेच समुपदेशन व इतर कारणांच्या नावाखाली वाहनांवर तब्बल 12 लाख 63 हजार रुपयांची उधळपट्टी केली होती. हा सर्व प्रकार एका वृत्तपत्राने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.