रायगडात गोविंदोत्सवाचा जल्लोष
श्रावणसरीने हजेरी लावल्याने गोविंदात उत्साह
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यत कृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार श्रावणसरीने हजेरी लावल्याने गोविंदाचा उत्साह व्दिगुणित झाला.
शुक्रवारी रात्री जन्माष्टमी सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात पार पडला. कथा, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते. जन्माष्टमीचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यामध्ये काही गावांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबागेत बालाजी मंदिर, राधा-कृष्ण मंदिर तसेच भाल नाका आदी ठिकाणी जन्माष्टमी सोहळा पार पडला.
शनिवारी सकाळपासून गोविंदांचे जथ्थेच्या जथ्थे गावागावात फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘तुझ्या घरात नाही पाणी घागर, रिकामी रे गोपाळा’ म्हणत ढोल-ताशांच्या तालावर गोविंदा नाचत होते. घरोघरी जाऊन साखळी पद्धतीने नाचून अंगावर पाणी घेत होते. दही पोह्याचा नवेद्य खाऊन पुन्हा दुसऱ्या घरी पाणी घेण्यासाठी जात असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत होते.
मच गया शोर सारी नगरी रे.., गोविंदा आला रे आला.., ढाकुमाकूम..ढाकुमाकूमसारख्या िहदी -मराठी गाण्यांवर नाचणारे गोविंदा लाल, पिवळ्या, पोपटी रंगाचे टी शर्ट घालून कपाळाला गोविंदांची पट्टी बांधून दहीहंडी फोडण्यासाठी शहरात आणि परिसरात मोठय़ा संख्येने फिरत असल्याचे पाहायला मिळत होते. गल्लीतील आणि नाक्यावरच्या छोटय़ा-मोठय़ा दहीहंडय़ा फोडून गोंविदांनी आनंद व्यक्त केला. यावर्षी महिला गोविंदा पथकेही हंडी फोडताना दिसत होती.
रायगड जिल्ह्य़ात यावर्षी ८हजार ९७९ दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १ हजार ९१७ सार्वजनिक, तर ७ हजार ६२० खासगी दहीहंडय़ांचा समावेश होता. पनवेल, खोपोली आणि कर्जत येथे लाख मोलाच्या दहीहंडय़ांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरात शेतकरी भवन , जोगळेकर नाका, चेंढरे, मेटपाडा, रामनाथ, मारूती नाका आदी ठिकाणी दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. कोळीवाडय़ातून गोविंदोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान गोविंदात्सवात कायदा- सुव्यवस्था अबाधित राखली जावी. म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
चौकट
आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्ह्या परिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी स्पर्धेवर लाखोंची उधळण केलेली दिसून आली. काही ठिकाणी नेत्यांनीही हजेरी लावली होती जिल्ह्यातील अलिबाग, पेण , पाली, रोहा महाड, आदी भागात मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या होत्या. डीजेवर गाणी सेलिब्रेटींची उपस्थिती यामुळे स्पर्धेला रंगत चढली होती.