मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार —-मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

28

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार —-मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार असून, या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आवश्यक सूचना दिल्या आहेत. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात विकासाच्या बहुतांश योजना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यामुळे त्यांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करून, त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे. हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर राबविले जाणार आहे. यामधून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना मोठ्या रकमेचे पुरस्कार मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
हे अभियान जिल्ह्यात सुनियोजितपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत आहे. प्रत्येक तालुक्यात अभियानासाठी 20 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, सदर ग्रामपंचायर्तीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कोकण विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त आस्थापना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पंचायत समिती स्तरावरावरील अधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. दि.17 सप्टेंबर रोजी सर्वा ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्य शाळा संपन्न झाल्या असून 17 सप्टेंबर 2025 रोजी सर्व ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, व्यावसायिकांना निमंत्रित करावे तसेच त्यांचा यथोचित सन्मान करावा. तसेच गावातील महिला बचत गट, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्तरीय सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल, युवक, भजनी मंडळ, युट्यूब व इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध व सक्रीय कार्यकर्ते, शासनाचे विविध योजनांचे लाभार्थी ग्रामसभेस उपस्थित राहणार आहेत. या ग्रामसभांना मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. सर्व आमदार, खासदार यांना या सभेस आपल्या मतदार संघातील एका ग्रामपंचायतीद्वारे उपस्थित राहण्यासाठी ग्रामविकास मंत्री यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे.
या अभियानाचे लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे, सक्षम पंचायत, स्वनिधी, विकासनिधी व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे,मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे प्रमुख सात घटक आहेत.