Home latest News जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात
जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात
आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचे आदी सेवा पर्व सुरू
–जिल्हाधिकारी किशन जावळे
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग-आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचे आदी सेवा पर्व सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, अपना गाव समृद्धी का सपना या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास करणे आहे. त्यासाठी निवडलेल्या गावांमध्ये व्हिलेज अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. गावकरी एकत्र येऊन त्यांच्या गरजा ओळखून विकास आराखडा तयार करतील आणि शासनाकडे सादर करतील हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आदिवासीपर्यंत पोहोचवणे तसेच यामध्ये महिला व बाल कल्याण, ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या 17 विभागांच्या 25 योजनांचा समावेश आहे. या अभियानात शासकीय अधिकारी आदी कर्मयोगी म्हणून, तर शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आदी सहयोगी म्हणून काम करतील. आदिवासी समाजातील उत्साही तरुण आदी साथी म्हणून सहभागी होणार आहेत.
एक खिडकी केंद्राच्या माध्यमातून गावांमध्ये आदी सेवा केंद्र सुरू केली जातील. या केंद्रांमार्फत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि जल-स्वच्छता यांसारख्या सेवा उपलब्ध होतील, ज्यामुळे ग्रामस्थांचा थेट शासनाशी संपर्क होईल आणि त्याच्या समस्यांचे निराकरण होईल.
अंमलबजावणीः जिल्ह्यात एकूण 113 गावे निवडली आहेत. यामध्ये कर्जत (24), पनवेल (10), उरण (02), खालापूर (10), पेण (20), अलिबाग (13), मुरुड (02), रोहा (09), सुधागड (02), माणगाव (02), तळा (01), श्रीवर्धन (03), म्हसळा (01) आणि महाड (02) तालुक्यांचा समावेश आहे. दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 पर्यंत या अभियानास सेवा पर्व तसेच आदी सेवा अभियान म्हणून संबोधले जाणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले या सहअध्यक्ष आणि समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तसेच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पेण येथील प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख सक्रिय सहभाग घेत आहेत.