शेकापची महावितरणच्या कार्यालयावर धडक
भरमसाठ वीज बिलाविरोधात आक्रमक भूमिका
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ जिल्ह्यात सध्या सुरू आहे. भरमसाठ वीज बिल, रिडींग न घेणे अशा अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना होणाऱ्या या त्रासाबाबत शेकाप आक्रमक झाला आहे. सोमवारी (दि.15) शेकाप तालुका चिटणीस मंडळाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली. भरमसाठ बिल येणे थांबवा, नियमीत दर महिन्याला रिडींग घ्या अशी मागणी केली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्या मागणीची दखल घेत कार्यवाही केली जाईल असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
यावेळी शेकाप तालुका सहचिटणीस नरेंद्र म्हात्रे, शहर चिटणीस अनिल चोपडा, प्रफुल्ल पाटील, राजन पांचाळ, अनिल पाटील, नंदकुमार तळकर, आदी पदाधिकारी, वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरण कंपनीकडून सक्तीचे स्मार्ट मीटर लावण्याचा गोंधळ सुरु असताना महावितरण कंपनीकडून वेळेवर वीज बिल येत नाही. त्यामुळे ग्राहकांना विशेष करून नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तीन ते चार महिन्याचे एक रकमी बिल भरणे ग्राहकांना शक्य होत नाही. भरमसाठ वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. ऐन सणासुदीत भरमसाठ वीज बिल येत असल्याने महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजीचे सुर उमटले जात आहे. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आल्यावर शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी पुढाकार घेत शेकापच्या शिष्टमंडळांनी जनतेच्या हितासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर घेत महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढाच शेकाप कार्यकर्त्यांनी वाचून दाखविला.
भरमसाठ वीज बिल एक रकमी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने बिल भरण्याची सवलत द्यावी. विद्यूत युनीट घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे ग्राहकांना वीज वापराची योग्य माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नियमीत दर महिन्याला विद्यूत युनीट घेण्यात यावे अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल तातडीने न झाल्यास जनतेच्या हितासाठी शेकाप मार्फत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
महावितरणचा अजब कारभार
अलिबागमधील कस्टम बंदर येथील मच्छिंद्र मारुती पाटील यांना दर महिन्याला महावितरण कंपनीचे वीज बिल 500 ते 700 रुपये येते. त्यांच्याकडून विजेचा वापर फार होत नसल्याने शेकड्यातच बिल येते. परंतु, या महिन्याचे वीज बिल लाखात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना 1 लाख 23 हजार 670 रुपये बील आल्याने महावितरणचा अजब कारभार उघड झाला आहे. या प्रश्नाबाबत सुरेश घरत यांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत वीज बिल तात्काळ कमी करण्यात यावे अशी ताकीद दिली.