वाशिम जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम, कोरोना बाधितांसाठी उपलब्ध खाटांची माहिती आता एका क्लिकवर

52

वाशिम जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम, कोरोना बाधितांसाठी उपलब्ध खाटांची माहिती आता एका क्लिकवर


जिल्हा प्रशासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम :-  कोरोना बाधितांसाठी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने सदर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती केली आहे. स्मार्टफोन अथवा संगणकावर washimcorona.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही माहिती पाहता येईल.

कोरोना बाधितांसाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती washimcorona.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘डॅशबोर्ड’वर जिल्ह्यातील सर्व १७ उपचार केंद्रातील १०५८ सर्वसाधारण खाटा, ७ रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधा असलेल्या १९० खाटा आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या २ रुग्णालयातील ५७ खाटांची अद्ययावत माहिती अपलोड केली जाणार आहे. प्रत्येक कोविड केअर सेंटर व रुग्णालयनिहाय उपलब्ध खाटा, दाखल रुग्ण व शिल्लक खाटांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्या, जिल्ह्यात तसेच जिल्ह्यात आढळलेले एकूण बाधित, नकारात्मक अहवाल, सद्यस्थितीत उपचार घेत असलेले (ऍक्टिव्ह) रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण, प्रलंबित अहवाल, मृत्यू आदी विषयीची माहिती सुद्धा ‘डॅशबोर्ड’वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कोविड बाधितांसाठीच्या रुग्णवाहिका व इतर महत्वाचे संपर्क क्रमांक सुद्धा ‘डॅशबोर्ड’वर दिले आहेत.