महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविणाऱ्यास बेड्या
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चंद्रपूर, 16 नोव्हेंबर
अंगणात रांगोळी टाकत असताना अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविल्याची घटना बियानी नगरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पोलिसांनी आरोपीस अटक केली. मंगेश वसंता हिंगाणे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सुनीता विजय कोकुलवार ही महिला दिवाळीनिमित्त आपल्या घरासमोरील अंगणात रांगोळी टाकत होती. याचदरम्यान, मुसका बांधून आलेल्या एका युवकाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली. पण, ही बाब तिच्या लक्षात आली. तिनेही सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. अर्धी सोनसाखळी आरोपीने लांबवली तर अर्धी फिर्यादीच्या जवळ राहली. लागलीच घटनेची तक्रार रामनगर पोलिसात नोंदवण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथक रवाना केले. याप्रकरणात कु‘यात आरोपीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक रविद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात राजेश मुळे यांच्या नेतृत्वात लता वाढई व गुन्हे शोध पथकाने केली.