पाच आणि चार वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

जयसिंगपूर : दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली.

जांभळी (ता. शिरोळ):- दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले वय 24, मृणाली शिवाजी भोसले वय 4, मृण्मयी शिवाजी भोसले वय 5 अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुप्रिया भोसले या सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलींना घेऊन अंगणवाडीमध्ये उंची, वजन करण्याकरिता जाते, असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने पती शिवाजी यांनी शोधाशोध सुरू केली. जांभळीसह ठिकठिकाणी व नातेवाइकांकडे शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्याने शिरोळ पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी जांभळी येथील पिराच्या मळ्यातील विहिरीत लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांच्या रेस्क्यू पथकाने शोधमोहीम राबवून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर पती शिवाजीसह नातेवाइकांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे यांनी पाहणी केली. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सुप्रिया हिचा पाच वर्षांपूर्वी शिवाजी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.

मंगळवारी सकाळी पती शिवाजी याने नातेवाईक, पै-पाहुण्यांकडे चौकशी केली होती. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली होती. त्यावरून शोध घेत असताना विहिरीत मुलगी मृण्मयी हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यावरून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

जांभळी ओढ्यालगत असणाऱ्या गट नं. 349 मधील विहिरीभोवती झाडेझुडपे आणि पाण्यावर तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे वजीर रेस्क्यू फोर्स पथकाला मृतदेह शोधताना अडचणी आल्या. झाडे तोडून पाण्यात जाण्यासाठी मार्ग करण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here