गेल्या १० वर्षात २,४०,६२५ भारतीय नागरिकांनी अवैध मार्गानी, योग्य डॉक्युमेंटशिवाय केली आहे अमेरिकेत घुसखोरी. का ? कशी ? कशासाठी?

मनोज कांबळे: बजरंगी भाईजानमध्ये सलमान खान मुन्नीला घरी सोडण्यासाठी तारोंके के नीचेसे पाकिस्तानात गेला होता. पण खऱ्या आयुष्यात लाखो भारतीय तारोंके के नीचेसे अमेरिकेत घुसखोरी करत आहेत? अमेरिकेन ड्रीमच्या लोभाने गेल्या १० वर्षात २,४०,६२५ भारतीय नागरिक अवैध मार्गानी, योग्य डॉक्युमेंटशिवाय जीव धोक्यात घालून अमेरिकेच्या दक्षिणेकडील मेक्सिको बॉर्डर आणि उत्तेरकडील कॅनडा बॉर्डरवरून अमेरिकेत शिरले असल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्या दहा वर्षात असे काय बदलले?

२०१३ साली अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांची संख्या १०६७ होती. २०१८ साली ही संख्या ९२३४ झाली. २०२३ मध्ये मात्र अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण प्रचंड वाढून ९६,९१७ इतके गेले आहे. अशी घुसखोरी करण्यात संख्येने मेक्सिको, एल साल्वाडोरनंतर भारतीयांचा क्रमांक येतो.

यामध्ये प्रामुख्याने तरुण भारतीयांचा संख्या जास्त आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलं असणारी कुटुंब, १८ वर्षाखालील मुले-मुली यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत शिरण्याचा प्रवास अनेक देशांतून पार होत जाणारा, खडतर आणि प्रसंगी जीवघेणा असतो.

Image

अमेरिकेत अवैध प्रवास करणारे बहुसंख्य लोक हे पंजाब आणि गुजरात या दोन राज्यातून असल्याचे दिसून येते. हा प्रवास घडवून आणणारे खास एजन्ट्स या राज्यात आपल्याला पाहायला मिळतात. जे प्रत्येकी 30-35 लाख रुपये घेऊन “डॉंकी रूट” ने भारतीयांना अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था करतात.

प्रवासाच्या सुरुवातीला लोक विमानाने दक्षिण अमेरिकेतील ब्राझील किंवा इक्वेडोर देशांमध्ये, पुढे कोलंबियामध्ये प्रवास करतात. तिथे त्यांना पुढील टप्प्यात मदत करणारा खास एजन्ट भेटतो, ज्याला ‘डॉंकर’ असे म्हटले जाते. हे ‘डॉंकर’ प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, देशांनुसार बदलतात.

इथून पुढे प्रवासाचा जीवघेणा टप्पा सुरु होतो. कोलंबिया देशांतून स्थानिक पोलीस, ड्रग माफिया यांच्यापासून जीव वाचवत सीमावर्ती भागातून पनामा देशात प्रवास केला जातो. यादरम्यान तब्बल १०० किमी अंतराच्या ‘डॅरिएन पास’ च्या घनदाट जंगलातून वाट काढत करावा लागतो.

रात्रीच्या अंधारात, अन्न पाण्याविना हिंस्र जनावरांपासून जीव वाचवत लहानग्या मुलांसह हा प्रवास अनेकांना झेपत नाही आणि अनेकांचा यादरम्यान मृत्यू होतो. आज असे अनेक मृतदेह ‘डॉंकी रूट’ च्या वाटांवर बेवारस पडलेले सापडतात. या खडतर प्रवासातून जरी तुम्ही वाचलात तरी गँगस्टर, ड्रग माफियाचे दरोडे प्रवाशांच्या जत्थ्यावर होत राहतात. जे तुमच्याकडील पैसे तर लुबाडतातच, पण विरोध केल्यास थेट गोळी झाडून ठार करतात. आजारी पडलात, जखमी झालात तर तुम्हाला तसेच मागे ठेवून ‘डॉंकर’ इतरांना घेऊन पुढे जातो. पनामा, कोस्टा रिका, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला सारख्या दक्षिण अमेरिकेतील देशांमधून पायी, प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या, खाडी, डोंगराळ प्रदेशातून प्रवास करताना सर्वत्र हीच परिस्थिती असते. इथे तुमचा कुणीही वाली नसतो. 

लोकांसाठी खास गुप्त अड्डे बनवून ठेवलेले असतात. या अड्ड्यावर मेक्सिकन पोलिसांच्या धाडी पडतात. त्यावेळी पकडलेल्या लोकांना मेक्सिकन प्रशासन त्यांच्या देशात पुन्हा पाठवले जाते. जे इथूनही वाचतात ते पुढे मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेकडे प्रवास करतात.मेक्सिको देशाची सीमा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, ऍरिझोना, न्यू मेक्सिको आणि टेक्सास या चार राज्यांशी जोडलेली आहे. या सीमेवर तारांचे कुंपण, उंच जाळ्या, ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती असताना बांधलेल्या ३० फूट उंच भिंतीचे संरक्षण आहे. पण लोकांनी यातूनही मार्ग काढले आहेत.

कुंपण तोडून, जमिनी खालच्या भुयारांतून, रिओ ग्रँडे नदीचा प्रवाह पार करून तर कधी चक्क संरक्षण भिंत चढून लोक शेवटी अमेरिकेत पाऊल ठेवतात. पुढे अमेरिकन सीमा सुरक्षा दलाच्या हाती लागताच भारतात जीव धोक्यात असल्यामुळे आम्ही अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी आलो, असे कारण दिले जातेउत्तरेकडून कॅनडा बॉर्डरवरून सुद्धा हजारो भारतीय रक्त गोठवणाऱ्या मायनस तापमानात अमेरिकेत शिरतात पकडले जात आहेत. या मार्गावरून प्रवास करताना भारतीय नागरिक मृत्युमुखी पडलेल्या घटना अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत.

२०१८ साली मेक्सिकन डॉंकी रूटवरून प्रवास करणाऱ्या संजीव कुमारला पायाला दुखापत झाल्याने चालत येत नसल्याने ‘डॉंकर’ ने त्याची गोळी झाडून हत्या केली. दुसऱ्या घटनेत एक वडील मुलीला घेऊन संरक्षक भिंत चढताना पडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. २०२२ साली कॅनडामधून चालत अवैध रीतीने अमेरिकेत शिरण्याच्या प्रयत्न करणारे आई-वडील आणि दोन मुलांचे एक गुजराती कुटुंब -३० अंश थंडीत गारठून मृत अवस्थेत स्थानिक प्रशासनाला सापडले होते.’डॉंकी रूट’ वर असे अनेक भारतीय आपला जीव गमावत आहेत.

जगदीश पटेल(३९), वैशाली पटेल (३७), मुलगी विहांगी पटेल (११), मुलगा धार्मिक पटेल (३) यांचा कॅनडावरून अमेरिकेत अवैध मार्गाने चालत बॉर्डर क्रॉस करताना थंडीमुळे झाला होता गारठून मृत्यू

काहींचा पत्ता लागतो, काहींचे बेवारस मृतदेह ‘डॉंकी रूट’ वर धोक्याचा इशारा बनून राहतात. हा खटाटोप कशासाठी?

भारत देशात आम्हाला आमचे यशस्वी भविष्य दिसत नाही. बहुसंख्य लोक हेच म्हणतात. वैध मार्गाने व्हिसा मिळत नाही, मग त्यांच्याकडून हे टोकाचे पाऊल उचलले जाते.दुसरीकडे २०१८ पासून तब्बल ८,३९,८५० भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात राहणे पसंत केले. एवढ्या मोठ्या संख्येने वैध आणि अवैध जीवघेण्या मार्गाने भारतीय भारत देश सोडून का जात आहेत?

अमेरिकेन, युरोपिअन लाईफस्टाईलचा मोह? कि विश्वगुरु बनण्याचे स्वप्न बघताना, स्वतःच्या देशातील नागरिकांनाच सुरक्षित- यशस्वी भविष्य घडवण्यास अनुकूल भारत बनवण्यास आपण कुठे कमी पडतो आहे? गरजू लोकांचा गैरफायदा घेणाऱ्या भारतातील डॉंकी रूट सेंटरवर कारवाई होणार आहे का?

 प्रश्न विचारणे गरजेचे आहे?

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here