विदर्भात बर्ड फ्लूचा शिरकाव; यवतमाळमधील आर्णीत 10 किलोमीटरचा अ‍ॅलर्ट झोनघोषित

यवतमाळ :- कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणार्‍या जिल्ह्यात आता ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाने शिरकाव केला आहे. आर्णी येथील आठ मोरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दहा किलोमीटरचा जंगल परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिघातून बर्ड बाहेर जावू न देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता ‘बर्ड फ्ल्यू’चा धोका निर्माण झाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांत मागील काही दिवसांपासून ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव वाढत आहे. पाहता पाहता ‘बर्ड फ्ल्यू’ने यवतमाळ जिल्ह्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे.

पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या दोनशे कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला आहे. आर्णी तालुक्यात आठ मोर दगावले असून, यवतमाळ शहरात पक्षी मरून पडल्याची घटना घडली. या घटनेतील सर्व नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथे पाठविले होते. आर्णी येथील मोरांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. सर्व नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. वनक्षेत्र असल्याने नागरिकांना यापासून धोका नाही.

सावधगिरी म्हणून दहा किलोमीटरचा परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात 17 पथके तयार करण्यात आलेली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर एक व एक पथक जिल्हास्तरावर असणार आहे. ‘रॅपिड रिपॉन्स टीम’ म्हणून पथके कार्यरत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here