मुंबई पहिल्या दिवशी एकूण दहा केंद्रांवर व्हॅक्सिनेशन.
मुंबई:- महानगरपालिकेच्या वतीने एकूण 9 लसीकरण केंद्रांवर मिळून 40 लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या वतीने केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोव्हिशील्ड’ लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले असून लसीकरण करण्यात येत आहे.
या लसीसाठी नोंदणी करून दिलेल्या टोकन क्रमांकानुसार लस देण्याचे काम सुरू होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. लस दिल्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात नेण्यात येत होते. लसीकरणाने आम्हाला अधिक बळ आले असल्याची प्रतिक्रिया आली. करोनाविरोधात लढणाऱया सर्वांनाच लस घेतल्याचा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार 3 टप्प्यांत मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी उदा. स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱया टप्प्यात 50 वर्षांवरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षांखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यासाठी केंद्र शासनाने ‘को-विन’ हा डिजिटल मंच विकसित केला आहे. या माध्यमातून पहिल्या व दुसऱया टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या को-विन ऍपमधून लसीकरणाच्या लाभार्थींना एसएमएस गेलाच नाही. त्यामुळे डॉक्टरांसह पालिका कर्मचाऱयांचे काम वाढले. रात्री लाभार्थींच्या याद्या घेऊन त्या पालिकेच्या सर्व वॉर्डमधील वॉर रूममध्ये पाठवण्यात आल्या. वॉर रूममधून लाभार्थ्यांना फोन करण्यात आले. तसेच प्रत्येक वॉर्डमधील आरोग्य अधिकाऱयांनी लाभार्थ्यांना बल्क मेसेज पाठवले. त्यामुळे मुंबईत आज लसीकरण सुरळीत पार पडले, अशी माहिती आरोग्य अधिकाऱयाने दिली.