मुंबईःप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.
सुमारे अडीच हजारहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसके यांच्यावर आहे. डीएसके यांनी खुद्द न्यायालयाचीही दिशाभूल केली असल्याने आता ते विश्वासपात्र राहिलेले नाहीत, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले होते. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेची चार पथके रवाना करण्यात आली होती.
डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी मुंबई व पुण्यात गुन्हे दाखल झाल्याने त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. आपला हेतू दाखवून देण्यासाठी डीएसकेंनी ५० कोटी रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याची हमी दिली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावेत या उद्देशाने उच्च न्यायालयानेही त्यांना वारंवार अटकेपासून संरक्षण दिले. अखेरची संधी म्हणून त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंतची मुदतही दिली होती. मात्र, बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रस्तावित कर्जाच्या नावाखाली पुन्हा दिशाभूल केली जात असल्याचे शुक्रवारी उघड झाल्याने न्या. साधना जाधव यांनी त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली. अखेरीस डीएसके व हेमंती यांचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतानाच पोलिस त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यास मोकळे असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here