भाजप सरकारच्या नीती आणि नियत मध्ये खोट आहे. अर्थनीतीमध्ये स्वार्थ आहे तर नियतीमध्ये द्वेष आहे – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
सिद्धांत
१७ फेब्रुवारी, मुंबई: पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी विडिओद्वारे जनतेशी सवांद साधला. पंजाबी भाषेमध्ये सवांद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर मुद्देसूद टीका केली. कोरोना पँडेमिकमधील नियोजन, परराष्ट्र धोरण, संविधात्मक संस्थांचा गैरवापर, पंजाबी जनतेचा अपमान करणे यांसारखे आरोप भाजपवर करत त्यांनी पंजाबच्या जनतेला काँग्रेसला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले.
आपल्या विडिओची सुरुवात करत सिंग म्हणाले कि, भारत देश एक महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये येऊन तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी मनाई केल्याने मी ह्या विडिओद्वारे तुमच्याशी सवांद साधत आहे.
पुढे मोदी सरकारवर टीका करत ते म्हणाले, कोरोनाकाळात भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील जनतेला बेरोजगारी, वाढती महागाई सारख्या भीषण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी आपल्या चूक मान्य करून जनतेच्या फायद्याच्या योजना राबवण्यापेक्षा नरेंद्र मोदी जवळपास सात दशके पूर्वी भारताचे पंतप्रधान बनलेल्या नेहरूंना दोषी मानून स्वतःचे गुन्हे लपवत आहेत.
https://youtu.be/GbhjOb4AwW0
देशाच्या पंतप्रधान पदाचे एक महत्त्व असते. मी पंतप्रधान असताना बिनकामाचे उगाचच बोलत बसण्यापेक्षा मी माझे काम कसे बोलेल याला महत्त्व देत होतो. माझ्या पंतप्रधान पदाला कोणतीही ठेच पोहचेल असे कोणतंही काम मी केले नव्हते. याउलट माझ्यावर कमजोर, भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपचा खोटेपणा आज देशभरात उघड होत आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांना पंजाबी लोकांच्या बहादूरीची आठवण देत मनमोहन सिंग म्हणाले कि, ह्या सरकारकडून पंजाबची बदनामी करण्याचे काम चालू आहे. पंजाबमधील लोकांची देशभक्ती, त्यांनी देशासाठी दिलेली कुर्बानी यासाठी जग पंजाबी लोकांना सलाम करते. इथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी किसान आंदोलन उभारले, त्या आंदोलनाला क्रूरपणे दडपण्याचे काम या सरकारने केले. पंजाबी मातीत जन्मलेला एक पंजाबी या नात्याने मला ह्या घटनांचे खूप दुःख वाटले.
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना मनमोहन सिंग म्हणाले कि, ह्या सरकारला देशाची आर्थिक धोरणे कशी राबवावी याचे ज्ञान नाही. त्याच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आज शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशात सामाजिक असमानता वाढली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत बनत आहेत तर गरीब अधिक गरीब बनत जात आहेत. परंतु खोटे सरकारी आकडे दाखवून हे सरकार लोकांची दिशाभूल करत आहे.
हे आपण वाचलंत का?
- दिल्ली पोलिसांच्या वर्दीवरील लोगोचा वाद, सम्राट अशोकाच्या अशोक स्तंभाला लोगोमधून काढल्याचा आरोप
- कुशीनगरमध्ये लग्न समारंभाच्या वेळी विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू
ह्या सरकारच्या नीती आणि नियत मध्ये खोट आहे. अर्थनीतीमध्ये स्वार्थ आहे तर नियतीमध्ये द्वेष आहे.आपला स्वार्थ साधण्यासाठी हे सरकार लोकांना एकमेकांबरोबर लढवत आहे. ह्या सरकारचा नकली राष्ट्रवाद देशासाठी फार धोकादायक आहे. ह्या सरकारने संविधानिक संस्थाचा गैरवापर केला आहे.
हे सरकार परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला. ते पुढे म्हणाले कि, चिनी सैनिक भारताच्या पवित्र भूमीवर कब्जा करून बसले आहेत. परंतु ह्या गोष्टीला पाठीशी घालण्याचा सरकारतर्फे प्रयत्न केला जात आहे. आपलं मित्र देश आपल्यापासून दुरावले आहेत. मी अशा करतो कि सरकारला एव्हाना कळाले असेल कि, नेत्यांची जबरदस्तीने गळाभेट घेऊन, बोलवल्याशिवाय बिर्याणी खायला जाऊन मित्र-देशांमधले संबंध सुधारता येत नाही.
विडिओचा शेवट करताना मनमोहन सिंग यांनी जनतेला आवाहन केले कि, भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे तुमच्यासमोर उभ्या राहिलेल्या समस्यांपासून सुटकारा पाहिजे असल्यास येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान करा.