भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाचा पारंपरिक गड !
लोकसभेची जागा आपल्याकडेच असणार- खासदार सुनील मेंढेचा दावा !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भंडारा-गोंदिया लोकसभेवरून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र, ७ मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रफुल पटेल यांनी गोंदिया-भंडारा या लोकसभेवरचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही, असे वक्तव्य केले होते. यावर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा भाजपाचा पारंपरिक गढ असून यावेळी भाजपलाच टिकीट मिळणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मागच्या वेळेस दोन लक्ष मतांनी निवडून आलेलो होतो, यावर्षी त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ असेही सुनील मेंढे म्हणाले.
*प्रफुल पटेल यांच्या त्या वक्तव्याला मिळाला दुजोरा*
गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे ७ मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या दरम्यान राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांवर टीका करताना सर्व नेत्यांची कुंडली माझ्याकडे असल्याचे पटेल म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना जोरदार प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले होते. यावर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी मात्र स्वतःचा बचाव करून घेत प्रफुल पटेल ” यांनी लावलेला टोला १००% माझ्यासाठी नव्हता, असे म्हणत प्रफुल पटेल हे राष्ट्रीय नेते असून या भागातील नेत्यांची खडा ना खडा माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते भाषणात असे बोलले असतील असे म्हणत खासदार सुनील मेंढे यांनी प्रफुल पटेल यांच्या त्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
*राज्यसभेवर गेल्यावरही प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी आशादायी*
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच आपली भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी इच्छा पुन्हा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढायला पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे. पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल आपण बोलू शकत नाही, असे म्हणत त्यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली. यावेळी ते म्हणाले होते की, ‘उद्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी नक्कीच लढेल. त्यामुळे राज्यसभेवर गेल्यानंतर देखील प्रफुल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभेच्या मोह सुटला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.