कंत्राटी लेखापाल लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात अडकला
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोलीः बरोजगार युवकास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कंत्राटी लेखापालस रंगेहाथ पकडून अटक केली आहे रुपेश वसंत बारापात्रे (४०) असे आरोपी लेखापालाचे नाव आहे
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता युवक हा देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी असून, त्याला माल वाहतुकीकरिता वाहन खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे अर्ज केला. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याकरिता कार्यकारी लेखापाल रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले यांच्या नावाने १२ मार्चला ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे यास रंगेहाथ पकडून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजेश पद्मगिरवार, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.