अनियंत्रित दुचाकी झाडाला धडकली : तीन युवक जागीच ठार
अपघातानंतर दुचाकी जळून खाक
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम-घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास घडली. झाडाला धडक बसल्याने दुचाकी ही जळून खाक झाली. मृतात दोन सख्या भावाचा समावेश आहे.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती (वय 16) रा. वसंतपुर, ता. चामोर्शी, सौरभ सुभाशिष चक्रवर्ती (वय 20) रा. वसंतपुर व विशाल भुपाल बच्छाड (वय 19) रा. 10 नंबर, शिरपूर, तेलंगणा अशी मृतांची नावे आहेत
सविस्तर वृत्त असे की, वसंतपुर येथील साहेब चक्रवर्ती, सौरभ चक्रवर्ती या दोन भावंडासह त्यांचा तेलंगणा येथील नातेवाईक विशाल बच्छाड हे तिघे जण वसंतपूर येथून घोटकडे दुचाकीने जात असताना ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व थेट सागवान झाडाला आदळली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीही जळून खाक झाली. विशाल बच्छाड हा दुचाकी चालवत असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास घोट पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.