खासगी हॉस्पिटलमधील आक्षेपार्ह बिलांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करा: डॉ नितीन राऊत
पालकमंत्र्यांच्या कोविड आढावा बैठकीत सूचना.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नागपूर, दि.17:- कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खाजगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना..? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.
शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष अनूप मरार, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम लसीकरण सद्य:स्थिती, केंद्रे, साठा वाढविण्यासाठी उपाययोजना, लोकसहभाग, यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी या चर्चेमध्ये सद्य:स्थिती विशद केली. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. तिसरी लाट दारात असून त्यापूर्वी जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश दिले.
गाव पातळीवर लसीकरणासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये गावांची विभागणी केली.लस मिळाल्याबरोबर वितरण सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनेचा तपशील पालकमंत्र्यांनी मागितला. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचे उग्ररूप ग्रामीण भागात राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा बळकट करणे सुरू असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषध पुरवठा, आवश्यक यंत्र पुरवठा आणि बेड वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून रुग्णसेवा व्हावी, यासाठी त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्याशी समन्वय ठेवला जात असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी अस्तित्वात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट उभारणीची सद्य:स्थितीवरही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये 22 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून पायाभूत सुविधा काही ठिकाणी उभारली जात आहे. इएसआयसी हॉस्पिटलची माहिती घेतली. सध्या मनुष्यबळासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे निर्देश श्री. राऊत यांनी दिले.
हॉस्पिटल्समध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या संकल्पनेला कोरोना प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या काळात फायदा झाला. हॉस्पिटल्सने 80 टक्के बेड्स उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावतानाच महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे वैद्यकीय उपचार दिले गेले नसल्याच्या काही ठिकाणी तक्रारी आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खाजगी लॅब, आरटीपीसीआर, सीबीसी, सीआरपी,डी-डायमर, एलएफटी, केएफटी, एचआरसीटी तपासणीचे वेगवेगळे दर आकारत आहेत. याची चौकशी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची माहिती दररोज मोबाईलवर देणारी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कडक निर्बंधांच्या काळात विनाकारण बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरविणाऱ्याबाबत सायबर सेलकडे तक्रार नोंदवा व कारवाई करण्याबाबतचे त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबत राजकारण व्हायला नको, सर्व राजकीय मतभेद विसरून नागपूरमध्ये सध्या काम चालू असून त्याला गालबोट लागू नये. संयुक्त प्रयत्नातून नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. भारत बायोटेक प्रकल्प नागपुरात मिहानमध्ये यावा तसेच नागपुरात फार्मा कंपनी आणण्यासाठी ठोस कृती आराखडा एक आठवड्यात सादर करावा, एअर लिक्विड फ्रांस ही कंपनी नागपुरात 100 मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट टाकण्यास इच्छुक आहे. तातडीने त्यांच्या समवेत चर्चा करून पुढील रोड मॅप निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी विभागीय आयुक्तांना दिल्या. स्टेरॉईडच्या अतिवापराने म्युकरमायकोसीस सारखे भयंकर आजार वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वृत्तपत्रातून लेख, मुलाखती, संवाद साधून यावर जनजागरण केले पाहिजे. ओरल हायजीन विषयक माहिती दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
म्युकरमायकोसीस औषधांची मात्रा कशी असते, औषध किंमत, शस्त्रक्रिया खर्च आणि गोर-गरिबांसाठी माफक दरात कसे करता येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा एक गट तयार करून एस.ओ.पी.निश्चित करून सात दिवसात जिल्हा प्रशासन या संदर्भात अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मेडिकलमध्ये पॅथॉलोजी नमुने तपासणीसाठी बाहेर पाठविण्याच्या तक्रारीबाबत मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा.
शासनाने निर्बंध 31 मे पर्यंत वाढविले आहे. नागपूर शहरातील रुग्ण संख्या कमी व्हायला लागली म्हणून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यावी. रिकामटेकडयांवर कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावी. तसेच त्यांची चाचणी करून त्यांना 14 दिवस कॉरन्टाईन करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबतही त्यांनी पोलीस आयुक्तांना निर्देशित केले.
नागपुरात 24 तासात दोन हत्येच्या घटना घडल्या. त्याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच ग्रामीण भागातही 31 मेपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवण्याबाबत, ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु ठेवल्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी . बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा देखील घेण्यात आला.