सर्व बालकांना शालेय पाठ्यपुस्तके, नविन गणवेश, लेखन साहित्य
अभिजीत आर. सकपाळ, ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
मो: 9960096076
भिवंडी नवीन शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ चे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. त्यांच्यासह प्रांताधिकारी अमित सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, तहसीलदार अभिजित खोले, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव, गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले, तसेच सोनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाताई तरे व सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सोनाळे हद्दीतील पोलीस पाटील, पालक व ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ, शाळेत प्रवेश पावलांचे ठसा घेवून व टिळा लावून स्वागत करण्यात आले. विविध रंगीत फुगे, रांगोळ्या व सजावट यामुळे शाळा आकर्षक सजली होती. नवागत बालके व मान्यवरांचे स्वागत लेझीम व ढोल ताश्याच्या गजरात करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले. आज पहिल्याच दिवशी २० बालके पहिलीला दाखल झाली असून नविन प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांना शालेय पाठ्यपुस्तके, नविन गणवेश, लेखन साहित्य, बूट व मोजे तसेच दफ्तरे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.