कोकणातील एक हजार पत्रकारांचे अधिवेशन सप्टेंबरमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या कोकणस्तरीय पत्रकार संमेलनाला प्रचंड प्रतिसाद
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड : कोकणात असणाऱ्या एक हजार पत्रकारांचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकारी, सदस्य संमेलनामध्ये सर्वानुमते घेण्यात आला. कोकणसह, मुंबईतील सर्व पदाधिकारी, पत्रकार ही या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीण कोळआपटे यांनी दिली.कोकणामधील खालापूर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे कोकणस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कोकण विभागातील सर्व पदाधिकारी. पत्रकार, सदस्य सहभागी झाले होते. पत्रकारांच्या हितासाठी सर्वांना सोबत पुढे घेऊन जाऊन जोरकसपणे काम उभे करायचे आहे. हे काम उभे करत असताना पत्रकार, त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घ्यायचे असे उद्गार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या संमेलनात अध्यक्षीय भाषणामधून काढले. कोकणाच्या संमेलनामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचं ‘व्हॉईस ऑफ मीडिया’मध्ये सहभागी होण्याचे एक वर्तुळ पूर्ण झालं, असं मत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्यक्त केले.
पत्रकारांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे चला : संदीप काळे
कोकणातील संमेलनामुळे राज्याचे वर्तुळ पूर्ण झाले- अनिल म्हस्के
देशभरातील सर्व राज्यांतील एकोणतीस हजार पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेत नोंदणी केली आहे. पत्रकारिता हा आपला धर्म आहे. पत्रकार जगला तर लोकशाही टिकेल. तळागाळातील प्रत्येक पत्रकार, त्यांचे कुटुंब सक्षम करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटना कार्यरत आहे.
दोन वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये काम करणारा प्रत्येक जण देशभरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’मध्ये कृतिशील कार्यक्रमामुळे सहभागी झाला असे सांगत, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आगामी भूमिका संदीप काळे यांनी मांडली. भविष्यामध्ये राज्यात पत्रकार, त्यांचे कुटुंबीय यांना घेऊन अनेक उपक्रम घेऊन पुढे येणार आहोत. त्या उपक्रमा संदर्भातली आखणी आम्ही केलेली आहे. राज्यात आतापर्यंत साडेपाच हजार पत्रकारांना दहा लाखांचा विमा दिला. सेवानिवृत्ती वाढ, रेडीओ, टीव्ही, सोशल मीडिया यात काम करणाऱ्या पत्रकारांना मागच्या वर्षभरात न्याय मिळवून दिला, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली.पत्रकार आणि संविधान, बदलत्या पत्रकारितेमध्ये सोशल मीडियाची भूमिका, हे दोन परिसंवाद ही या संमेलनादरम्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोकणामधील अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकारांसाठी विमा, पत्रकारांच्या उच्च शिक्षण, शिक्षण, पत्रकारांचे महामंडळ, फेलोशिप योजना, पत्रकारांसाठी घरे, स्किलिंग, सेवानिवृत्तीनंतर काय? यासारख्या अनेक विषयांवर या संमेलनामध्ये चर्चा झाली.
कोकणस्तरीय संमेलनाचे संयोजक ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी त्यांनी देशभरामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सुरू असलेली संघटनात्मक बांधणी याविषयी माहिती दिली. कोकणामध्ये होणाऱ्या सप्टेंबर महिन्यातील अधिवेशना संदर्भातही पिंजारी यांनी भूमिका स्पष्ट केली. उत्कृष्ट नियोजनाबद्दल पिंजारी यांचा संस्थेच्या वतीने सन्मानही करण्यात आला. खालापूर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले , तहसीलदार अय्युब तांबोळी, खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्षा डॉ. सुनील गोटीराम पाटील, राष्ट्रीय संघटक पत्रकार खलील सुर्वे, प्रवक्ते नरेश जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीण कोळआपटे, कोकण विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र, शिवाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष प्रभाकर गंगावणे, ठाणे जिल्हाध्यक्ष अरुण ठोंबरे, पालघर जिल्हाध्यक्ष नरेंद्र एच. पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर माने यांची यावेळी भाषणे झाली. अनेकांनी परिसंवादात आपला सहभाग नोंदवला.
कोकणातील सर्व पत्रकारांना एकत्रित करणार – कोळआपटे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून कोकणातील सर्व पत्रकारांना एकत्रित आणले आहे. या एकत्रित आणलेल्या पत्रकारांचे सप्टेंबर महिन्यामध्ये कोकणामधले पहिलंवहिलं एक हजार पत्रकारांचं अधिवेशन आम्ही कोकणात आयोजित करणार आहोत, अशी माहिती कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीण कोळआपटे यांनी दिली. पुढच्या महिन्यात रायगड, पालघर, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणच्या सर्व जिल्ह्यात मेळावे आयोजित केले जातील. त्या मेळाव्यामध्ये पत्रकारांचे प्रशिक्षण, विमा, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कोकणामधील संमेलनाविषयी विचारविनिमय केला जाणार आहे. जिल्हावार होणाऱ्या संमेलन, कौटुंबिक मेळाव्यासंदर्भामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष प्रभाकर गंगावणे, ठाणे जिल्हाध्यक्ष अरुण ठोंबरे, पालघर जिल्हाध्यक्ष नरेंद्र एच. पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली.