सरकारचे बहिणींचे संसार उद्ध्वस्त करणारे पाऊल: तृप्ती देसाई
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- लाडकी बहीण योजनेचा निश्चितपणे सन्मान आहे. ही योजना राबविताना सरकारने महिलांचा गांभीर्यपूर्वक विचार केला आहे. परंतु, आता लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडत असल्याने आम्ही दारू कंपन्यांना परवाने देत असल्याचे सरकार सांगत आहे. लाडक्या बहिणींच्या नावाखाली योजना राबविण्यासाठी सरकारने दारू कंपन्यांना परवाने देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. बहिणीच्या संसाराचा गाडा चालावा यासाठी योजना आणून केवळ महसूल मिळविण्याचा विचार करून दारू कंपन्यांना परवाने देऊन बहिणींचे संसार उद्ध्वस्त करण्याचे पाऊल सरकार उचलत आहे, असा हल्लाबोल महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, 128 कंपन्यांना दारू परवाने देण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली आहे. 1972 मध्ये दारू कंपन्यांना असे परवाने देण्यात आले होते. त्यानंतर दारू कंपन्यांना परवाने कोणत्याही सरकारने दिलेले नाहीत. सरकारच्या दारू परवाने देण्याच्या निर्णयामुळे व्यसनाधीनता वाढेल आणि लाडक्या बहिणींचा संसार मोडतील. याला जबाबदार सरकारच राहील. त्यामुळे लाडक्या बहिणींचा संसार वाचविण्यासाठी दारू कंपन्यांना परवाने देण्याचा घेतलेला निर्णय सरकराने रद्द करावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तसेच, त्यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या विषयी देखील वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात कोठेही एखादे प्रकरण घडले आणि त्या प्रकरणात न्याय मिळवून द्यायचा असेल तर उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून खटल्याचे काम पाहावे, अशी मागणी आवर्जून केली जाते. मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबला शिक्षा मिळवून देण्यात उज्वल निकम यांचा सिंहाचा वाट आहे. संतोष देशमुखांची हत्या झाली त्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात उज्वल निकम यांनी काम पाहावे, अशी जनतेची मागणी होत आणि ते विशेष सरकारी वकील म्हणून लढत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी अडकलेले वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. परंतु, आता ते महायुती सरकारने राष्ट्रपती कोट्यामधून उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुती सरकार केंद्रात आणि राज्यात देखील आहे. त्याचवेळी उज्वल निकम राज्यसभेचे सदस्य म्हणजेच राज्यसभा खासदार होतात. त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळविण्याच्या दिशेने जनतेने डोळे लावले असतील तर आता उज्वल निकम यांनी हा खटला सरकारी वकील म्हणून लढू नये. कारण उज्वल निकम हे देखील आता महायुतीशी संबंधीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून त्या खटल्यामधून बाहेर पडावे, अशी स्पष्टोक्ती तृप्ती देसाई यांनी केली आहे.